विटावकरांचा प्रवास गतिमान करण्यावर भर देणार- आ. आव्हाड
(म.विजय)
ठाणे – साकेत ते कळवा या पुलाचे काम आता वेगवान पद्धतीने सुरु आहे. हा पुल खुला झाल्यानंतर विटावकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे. पण, तेवढ्याने आपणाला समाधान लाभणार नाही. त्यामुळेच आपण पटनी कंपनीजवळून थेट कोपरीपर्यंत पुल उभारण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे. हा प्रस्ताव मंजूर करुन घेण्यासाठी मी जीवाचे रान करेन; पण, विटावकरांचा प्रवास गतिमान करेन, असा शब्द आ. जितेंद्र आव्हाड यांनी विटावकरांना दिला.
आ. जितेंद्र आव्हाड यांनी ‘हितगुज’ ही मोहीम सध्या सुरु केली आहे. ’आमदार आपल्या दारी’ अशा संकल्पनेतून ते प्रत्येक विभागामध्ये जाऊन जनतेशी थेट संवाद साधत आहेत. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या तत्काळ मार्गी लावण्याचा यशस्वी प्रयत्न ते करीत आहेत. याच अनुषंगाने त्यांनी विटावा येथील नागरिकांशी संवाद साधला. जय भगवान डीएड कॉलेजमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास स्थानिक नगरसेवक जितेंद्र पाटील, आरती गायकवाड यांच्यासह विटावा भागातील हजारो नागरिक उपस्थित होते.
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात आ. आव्हाड यांच्यासमोर नागरिकांनी पाणी, रस्ते, वीज आदी समस्या मांडल्या. सर्व समस्यांचे आ. आव्हाड यांनी निराकरण केले. तसेच, येथील वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लावण्यासाठी आपण असीम गुप्ता हे आयुक्त असताना विटावा खाडी घाटापासूनच्या पुलाला मंजुरी मिळवून आणली असल्याचे नमूद केले. त्यामुळे विटावकरांना ठाणे स्टेशन गाठणे सुकर झाले असल्याचे सांगितले. त्यावर विटाव्यातील अनेक नागरिकांनी आ. आव्हाड यांचे आभार मानले. विशेष म्हणजे, विटाव्याचे टोक जिथे संपते; तिथून खाडीवर एक पुल बनविण्याचा प्रस्ताव आपण राज्य शासनाकडे मंजुरीसाठी दाखल केला आहे. या पुलाला मंजुरी मिळाली तर विटावकरांना हाय-वे गाठणे अत्यंत सोपे होणार आहे, असे सांगितले. मात्र, सध्याचे सरकारकडे पैसेच शिल्लक राहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे गैरलागू आहे. मात्र, आपण कशीही करुन मंजुरी मिळवूच ; नंतर आपलीच सत्ता येणार आहे. त्यामुळे हा पुल तयार करुन विटावकरांना वेगवान प्रवास देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, विटावा येथे नवीन गार्डन आणि ओपन जीम अवघ्या एका महिन्यात साकारुन देऊ, असे वचनही आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिले.
विटावा स्मशानभूमी येथील रस्त्याच्या वादाचे निराकरण करण्यासाठी आ. आव्हाड स्थानिकांसह वादाच्या ठिकाणी गेले. दोन्ही गटांची समजूत काढून त्यांनी सुवर्णमध्य साधून हा वाद जागेवरच संपवून टाकला.