वारजेतील एकाला नवीन हॉटेलचे बिल पडले सव्वादोन लाख रुपये,चव चाखायला गेलेल्या खवय्याला भुर्दंड
पुणे – कर्वेनगर मधील काकडे प्लाझा जवळ नव्याने झालेल्या एका हॉटेल मध्ये चव चाखायला गेलेल्या एका खवय्याला तब्बल सव्वा दोन लाखांचा भुर्दंड बसला असल्याची घटना समोर आली आहे. याबाबत वारजे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गेश ठाकूर (वय २२, रा.दांगट पाटीलनगर, शिवणे पुणे) यांनी वारजे पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुर्गेश ठाकूर हा आपल्या वडिलांसमवेत काल शुक्रवारी काकडे प्लाझा येथील बँक ऑफ बडोदा समोर गेला होता. यावेळी तेथे झालेल्या एका नवीन हॉटेल मधील पदार्थांची चव चाखण्यासाठी वडील आणि मुलगा गेले असता, अज्ञात चोरट्याने त्यांच्या अॅक्टीव्हा स्कूटरची डिकी उघडून त्यातील २ लाख २० हजार रुपयांची रोकड आणि बँकेचे पासबुक चोरून नेले.
हॉटेल मधून आल्यानंतर त्यांना गाडीची डिकी उघडी असलेली दिसली. यावेळी त्यांनी लगेचच डिकीत रक्कम आहे का पहिले असता, त्यात ती नसल्याचे आढळून आले. यावेळी ठाकूर यांनी तातडीने वारजे पोलिसांना घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. यावेळी भरदुपारी आणि रहदारीच्या रस्त्यावर चोरी झाल्याने पोलिसांनी तत्काळ तपास सुरु केला आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मीरा त्र्यंबके करत आहेत.