वन विभागातील रोजंदारीवरील 569 मजुरांना नियमित करणार

वन विभागात विविध कामांवर असणाऱ्या आणि ऑक्टोबर 2012 च्या शासन निर्णयानुसार पात्र ठरणाऱ्या 569 रोजंदारी मजुरांना नियमित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

वन विभागात वन्यजीव व्यवस्थापन, रोपे निर्मिती, रोपवाटिका, रस्त्यांची कामे, वन संरक्षण आदी कामांवर रोजंदारीने मजूर नेमले जातात. अनेक ठिकाणी नियमित पदे उपलब्ध नसल्याने रोजंदारी स्वरुपाच्या मजुरांकडून कामे पार पाडली जातात. विविध 22 प्रकारच्या कामांसाठी अशा प्रकारच्या मजुरांची आवश्यकता भासते.  वन विभागाच्या या कामांवर प्रदीर्घ सेवा करणाऱ्या आणि ज्यांच्या सेवेची आवश्यकता आहे अशा रोजंदारी मजुरांचा कायम करण्याबाबत विचार करण्यात आला आहे. वन विभागात योजनेंतर्गत अथवा योजनेतर योजनेमध्ये 1 नोव्हेंबर 1989 ते 31 ऑक्टोबर 1994 या कालावधीत सलग अथवा खंडित स्वरुपात प्रतिवर्षी किमान 240 दिवस या प्रमाणे किमान पाच वर्षे काम केलेल्या 8 हजार 39 रोजंदारी मजुरांना जानेवारी 1996 च्या शासन निर्णयानुसार 1 नोव्हेंबर 1994 पासून शासन सेवेत नियमित करण्यात आले. त्यानंतर पुन्हा मार्च 1998 मध्ये झालेल्या निर्णयानुसार 1619 व जानेवारी 2000 च्या निर्णयानुसार 607 मजुरांना शासकीय सेवेत सामावण्यात आले. अशा पद्धतीने एकूण 10 हजार 264 अधिसंख्य वनमजूर पदांवर रोजंदारी मजूर सामावले गेले. 

याशिवाय ऑक्टोबर 2012 च्या शासन निर्णयानुसार 6 हजार 546 मजूर निकषास पात्र ठरल्याने 1 जून 2012 पासून शासन सेवेत अधिसंख्य वन मजूर पदावर कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, याच शासन निर्णयानुसार आणखी काही रोजंदारी मजूर पात्र ठरत असल्याचे आढळून आल्याने याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार या शासन निर्णयातील निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या आणि वन विभागातील योजना अथवा योजनेतर निधीतून वेतन मिळणाऱ्या 569 रोजंदारी मजुरांना कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email