लोहा येथे राष्ट्रीय महामार्गाच्या अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे राष्ट्रीय महामार्गाच्या अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन केले. खासदार रावसाहेब दानवे आणि अन्य नेते यावेळी उपस्थित होते. या रस्त्यांची एकूण लांबी 248.569 कि.मी इतकी असून, त्यासाठी 5343 कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारतर्फे शेतकरी, शहरं, नागरिकांसाठी हाती घेण्यात आलेल्या विविध लोकोपयोगी कार्यक्रमांची माहिती दिली. जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, शहरं आणि गावं हागणदारीमुक्त करण्यासाठी तसेच रस्ते, पाणीपुरवठा इत्यादींसाठी केलेले उपाय इत्यादींची माहिती दिली. ते म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानामुळे नांदेड जिल्ह्यातील 674 गावे ही दुष्काळमुक्त झाली आहेत. पाण्याची पातळी 0.80 मीटरवरून 5.60 मीटर इतकी वाढली आहे. या जिल्ह्यात पूर्वी 400 टँकर लागायचे, आता 25 लागत आहेत. नांदेड जिल्ह्याने एकाच वर्षांत 2 लाख शौचालयांची उभारणी करून ग्रामीण महाराष्ट्र ओडीएफ करण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. जलयुक्त शिवारमुळे आज शेतकरी वर्षाला तीन पीके घेऊ शकत आहेत. रब्बीचे क्षेत्र 75 टक्क्यांनी वाढले आहे. संपूर्ण मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकार गतीने प्रयत्नशील आहे. आता 2019 पर्यंत प्रत्येक बेघराला घर देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गेल्या 67 वर्षांत 50÷00 कि.मीचे राष्ट्रीय महामार्ग तयार झाले, आता अवघ्या साडेतीन वर्षांत 15 हजार किमी.चे राष्ट्रीय महामार्ग तयार होत आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात 30 हजार कि.मीचे रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. 2019 पर्यंत हे काम पूर्णत्त्वास जाईल.