लोकलखाली चिरडल्याने तिघा माय-लेकींचा करुण अंत

 लोकलखाली चिरडल्याने तिघा माय-लेकींचा करुण अंत

– पुण्याहून नाशिककडे जाण्यासाठी निघालेल्या पुण्याच्या तिघा माय-लेकींचा भरधाव लोकलखाली चिरडून करुण अंत झाला आहे. ही घटना आज सकाळी ठाकुर्ली स्टेशनजवळ घडली. अपघाताची घटना पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींचे डोळेही पाणावले होते. राधिका (वय ८), संचिता (वय ११) आणि आई अनुराधा प्रकाश कवलकर (वय ३२) अशी मृतांची नावे आहेत.

प्रतिकात्म छायाचित्र

मृत माय-लेकी पुण्यातील त्रिवेणीनगर एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या आहेत. रविवारी पहाटेच्या सुमारास पुण्याहून इंटरसिटी एक्स्प्रेसने नाशिकला जाण्यासाठी निघालेल्या या तिघी मुंबईच्या दिशेने येत होत्या. या तिघींना कल्याण स्टेशनवर उतरायचे होते. तथापी इंटरसिटी एक्सप्रेस कल्याणमध्ये थांबत नाही. त्यामुळे ही एक्सप्रेस कल्याण स्टेशन सोडून पुढे आली.

कुर्ली स्टेशन जवळचे फाटक खुले असल्याने एक्सप्रेस तेथे थांबली. त्यामुळे या गाडीतील अन्य प्रवाशांसह या तिघीही खाली उतरल्या. मात्र काही कळायच्या आत कल्याणकडे भरधाव वेगात जाणाऱ्या लोकलखाली या तिघी माय-लेकी अडकल्या. हा अपघात पाहणाऱ्या एक्सप्रेसमधील व प्लॅटफॉर्मवर थांबलेल्या प्रवाशांनी एकच आरडाओरड केला.

लोकल भरधाव वेगात निघून गेल्यानंतर राधिका व संचिता या दोन्ही चिमुरड्यांचे मृतदेह रेल्वे मार्गावर अस्तव्यस्त पडलेले आढळून आले. मात्र आई अनुराधा यांचा श्वास सुरू होता. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेमधून मुंबईच्या सायन येथील लोकमान्य टिळक हॉस्पिटलच्या दिशेने हलविले. तथापी दुपारी एकच्या सुमारास अनुराधा यांचाही मृत्यू झाला. यासंदर्भात डोंबिवलीच्या लोहमार्ग पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. आज संध्याकाळी या तिघीही माय-लेकींचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. माय-लेकींच्या करुण अंतामुळे प्रवाशांनी हळहळ व्यक्त केली

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email