लोकलखाली उडी घेवून एकाची आत्महत्या।।
महाराष्ट्र जीवन प्रधिकरण प्रकल्प विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने लोकलखाली उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. राजू शामा खैरे (५५) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
सकाळी सव्वासहाच्या सुमारास अंबरनाथ रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म नं. १ वर राजू खैरे उभे होते. त्यावेळी स्थानकातून खोपोलीकडे जाणारी लोकल सुटताच राजू यांनी स्वतःला लोकलखाली झोकून दिले. लोकलने त्यांना उडवल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यावेळी रेल्वे स्थानकात ड्युटीवर असणारे ए.एस.आय. केसरकर यांनी त्यांना त्वरीत मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. परंतु, रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
राजू खैरे हे पूर्वी महाराष्ट्र जीवन प्रधिकरण प्रकल्प विभाग अंबरनाथ येथे मीटर वाचक म्हणून कामाला होते. २ महिन्यांपूर्वी त्यांची ठाणे येथे बदली झाली होती. गेल्या काही दिवसांपासून ते चिंताग्रस्त होते. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजले नाही. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास ए.एस.आय. केसरकर करत आहेत.