लघू उद्योगांद्धारे सर्वात जास्त रोजगारनिर्मिती – केंद्रीय रस्ते व वाहतूक महामार्ग, व केंद्रीय जलसंपदा मंत्री श्री. नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
देशाच्या विकासात सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे (एम.एस.एम.ई.) महत्वपूर्ण योगदान असून सर्वात जास्त रोजगार निर्मिती लघू व्यवसायाद्धारे होत आहे. उद्योग सुलभतेत वाढलेली क्रमवारी तसेच निर्यातीमध्ये घेतलेली आघाडी याआधारे भारताला एक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून जागतिक पातळीवर ओळख प्राप्त झाली आहे. केंद्र सरकारच्या एम.एस.एम.ई. क्षेत्राला सहाय्य व संपर्क अभियानाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या याक्षेत्रासंबंधीच्या घोषणा निश्चितच सहाय्यकारी ठरतील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे केले. बँक ऑफ इंडियाद्वारे स्थानिक कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित एम.एस.एम.ई. क्षेत्रासाठी सहाय्य व संपर्क अभियानाच्या कार्यक्रमाप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आवास व शहर व्यवहार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार ) श्री. हरदीप सिंग पुरी, पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, प्रामुख्याने उपस्थित होते.
सुक्ष्म व लघुउद्योगांना वित्त सहाय्य प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रातील सांगली व नागपूर या दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. या जिल्हयात अन्न प्रक्रिया उद्योगात सहभागी असणा-या एम.एस.एम.ई. ना वित्तसहाय्य प्राप्त करता येणार आहे. मुद्रा योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात आजपर्यंत 1 कोटी 9 लाख युवकांना 60 हजार कोटी रूपयाचे कर्ज मंजूर झाले असून याद्वारे अनेकांनी स्वयंरोजगार मिळवत इतरांनाही रोजगार मिळवून दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या विज्ञान भवन येथून एम.एस.एम.ई. क्षेत्राशी संबंधित सहाय्य व संपर्क अभियानाप्रसंगी केलेल्या संबोधनाचे देशभरातील 100 ठिकाणी थेट प्रसारण यावेळी करण्यात येत होते. नागपूरातही भट सभागृहात याचे प्रसारण मान्यवर व उपस्थितांनी बघितले. या कार्यक्रमात बॅक ऑफ इंडीयाचे अधिकारी, उद्योजक, महिला बचत गटाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.