रिक्षाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ज्येष्ठाचा मृत्यु
पुणे – एनडीए रस्त्यावरील शिवणे भागात एका पादचारी ज्येष्ठाला रिक्षाने ठोकरल्याने ज्येष्ठाचा मृत्यू झाला. याबाबत उत्तमनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदारास अटक करण्यात आली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शांताण्णा भोजराव पाटील (वय.६० रा.देशमुखवाडी, शिवणे, पुणे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठाचे नाव असून, शिवलीला मेलकुंदे (वय.३० रा.देशमुखवाडी, शिवणे, पुणे) यांनी उत्तमनगर पोलिसात तक्रार दिली आहे. तर रिक्षाचालक अनुज अशोक कनोजिया (वय.३१) आणि त्याचा साथीदार तरबेज मोती रेहमान (वय.२१ रा.दोघेही रा.हडपसर, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.
शांताण्णा पाटील हे शिवण्यातील देशमुखवाडी येथे असलेल्या लक्ष्मी को ऑप बँकेसमोर रात्री दहाच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना, भरधाव वेगात आलेल्या रिक्षाने त्यांना जोरात धडक दिली. ही धडक एवढ्या जोरात होती की, यामध्ये पाटील गंभीर जखमी झाले. यावेळी अपघात करून रिक्षाचालक अनुज कनोजिया हा घटनास्थळावरून पळून गेला. यावेळी काही नागरिकांनी पाटील यांना उपचारार्थ रुग्णालयात हलवले. तर काही नागरिकांनी कनोजिया याचा पाठलाग करत, त्याला पकडून, पोलिसांच्या ताब्यात दिले.
दरम्यान घटनास्थळावरून नागरिकांची पळापळ झाल्याची संधी साधत, रिक्षात त्यावेळी कनोजिया याच्याबरोबर असलेला त्याचा साथीदार तरबेज रहमान याने सदरील रिक्षा घटनास्थळावरून पळवून घेऊन गेला. मात्र उत्तमनगर पोलिसांनी त्याचा माग काढत रिक्षासह त्याला देखील ताब्यात घेतले. गुन्ह्यातील वाहन पळवून नेट पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेप्रकरणी त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनाही अटक करण्यात आली आहे. उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक ए. पी. जाधव तपास करत आहेत.