राष्ट्रवादीच्या युवक जिल्हा सरचिटणीसासह दोघांची गोळ्या झाडून हत्या

 

अहमदनगर – नगर शहरातील केडगाव येथील शिवसैनिकांच्या हत्येची घटना ताजी असतानाच आज पालकमंत्री राम शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या जामखेडमध्ये राष्ट्रवादी युवकच्या दोन पदाधिकाऱ्यांची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली. जामखेड-बीड रस्त्यावर शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने नगर जिल्हा हादरला असून, जामखेड शहरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हा सरचिटणीस आणि धर्मयोद्धा युवा मंचचे अध्यक्ष योगेश अंबादास राळेभात (३०) आणि राष्ट्रवादी युवकचा कार्यकर्ता राकेश अर्जुन राळेभात (वय २६, दोघेही रा. मोरेवस्ती, जामखेड) अशी हत्या करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. गोळीबारानंतर दोघेही गंभीर जखमी एका जागेवरच पडून होते.

जामखेड शहरातील बीड रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारा समोरील एका हॉटेलमध्ये योगेश आणि राकेश राळेभात हे सायंकाळी मित्रांसोबत बसले होते. यावेळी विनानंबरच्या एका दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोर आले. त्यापैकी एकाने खाली उतरून योगेश यांच्यावर समोरून दोन गोळय़ा झाडल्या. या दोन्ही गोळय़ा त्यांच्या छातीमध्ये घुसल्या. यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर राकेश हे मदतीसाठी धावले असता हल्लेखोरांनी त्यांच्यावरही गोळय़ा झाडल्या. यातील एक गोळी राकेश यांच्या छातीत घुसली. त्यामुळे तेही जागेवरच कोसळले. यानंतर हल्लेखोर दुचाकीवर बसून बीड रस्त्याने पसार झाले. घटनेनंतर नागरिकांनी त्यांना जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे दोन्ही रुग्ण उपचाराअभावी अर्धा तास पडून होते. अर्ध्या तासाने वैद्यकीय अधीक्षक सी. व्ही. लामतुरे आल्यानंतर प्राथमिक उपचार करून जखमींना नगरच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनास्थळी हल्लेखोरांनी झाडलेल्या आठ पुंगळय़ा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांवर कोणत्या कारणातून हल्ला करण्यात आला याचे कारण उशीरापर्यंत समजू शकले नाही. हल्ल्यानंतर जामखेडमध्ये तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज बाजारचा दिवस असल्यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. जामखेड शहरातील गोळीबाराची तीन महिन्यांतील दुसरी घटना आहे. फेबुवारी महिन्यात झालेल्या गोळीबारात दोघे जखमी झाले होते.

या घटनेनंतर पालकमंत्री राम शिंदे हे जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल झाले. यावेळी रुग्णालयात जमलेल्या संतप्त जमावाने पालकमंत्र्यांना घेराव घालून राग व्यक्त केला. संतप्त मृतांच्या नातेवाईकांचा रोष टाळण्यासाठी पालकमंत्री राम शिंदे खासगी गाडीतून रुग्णालयाच्या मागच्या दाराने पळाले.

दरम्यान, जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेतले जाणार नाही असा पवित्रा कुटुंबियांनी घेतला आहे. तसेच उद्या (रविवार) जामखेड बंदची हाक देण्यात आली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email