रामनवमी

रामनवमी अर्थात रामजन्म उत्सव

१. तिथी
रामनवमी हा उत्सव चैत्र शुद्ध नवमी या तिथीला साजरा करतात.

२. इतिहास
श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ रामनवमी साजरी करतात. या दिवशी पुष्य नक्षत्रावर, माध्यान्ही, कर्क लग्नी सूर्यादी पाच ग्रह असतांना अयोध्येत रामचंद्रांचा जन्म झाला.

३. महत्त्व
देवता अन् अवतार यांच्या जन्मतिथीला त्यांचे तत्त्व भूतलावर जास्त प्रमाणात कार्यरत असते. रामनवमी या दिवशी श्रीरामतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. रामनवमीला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप, तसेच श्रीरामाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीरामतत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास साहाय्य होते.

४. रामनवमी उत्सव भावपूर्ण होण्यासाठी हे करा !
अ. स्त्रियांनी नऊवारी साडी अन् पुरुषांनी सदरा-धोतर/पायजमा अशी सात्त्विक वस्त्रे परिधान करून रामनवमी उत्सवात सहभागी व्हावे.
आ. विद्यार्थ्यांसाठी ‘श्रीरामरक्षास्तोत्र’ पठणाच्या स्पर्धा, अखंड रामनामजप असे कार्यक्रम आयोजित करावेत.
इ. उत्सवाच्या ठिकाणी कर्णकर्कश संगीत लावणे, विद्युत रोषणाईचा झगमगाट यांसारख्या रज-तम निर्माण करणार्‍या कृती करू नयेत.
ई. रामनवमीच्या मिरवणुकीत टाळ, मृदुंग अशी सात्त्विक वाद्ये वापरावीत.

५. उत्सव साजरा करण्याची पद्धत
‘कित्येक राममंदिरांतून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस हा उत्सव चालतो. रामायणाचे पारायण, कथाकीर्तन आणि राममूर्तीला विविध शृंगार, अशा प्रकारे हा उत्सव साजरा होत असतो. नवमीच्या दिवशी दुपारी रामजन्माचे कीर्तन होते. माध्यान्हकाळी, कुंची (बाळाच्या डोक्याला बांधायचे एक वस्त्र. हे वस्त्र पाठीपर्यंत असते.) घातलेला एक नारळ पाळण्यात ठेवून तो पाळणा हालवतात आणि भक्तमंडळी त्यावर गुलाल अन् फुले उधळतात. (काही ठिकाणी नारळाऐवजी श्रीरामाची मूर्ती पाळण्यात ठेवतात. – संकलक याप्रसंगी श्रीरामाचा पाळणा(रामजन्माचे गीत) म्हटला जातो.’ त्यानंतर श्रीरामाच्या मूर्तीची पूजा करतात आणि प्रसाद म्हणून सुंठवडा देतात. काही ठिकाणी सुंठवड्याबरोबर महाप्रसादही देतात.

६. त्रेतायुगातील आणि कलीयुगातील रामनवमी

 

७. देवतांशी संबंधित तिथींविषयक माहिती
अ. रामनवमी : महत्त्व
‘त्रेतायुगात जेव्हा रामजन्म झाला, तेव्हा कार्यरत असलेला श्रीविष्णूचा संकल्प, त्रेतायुगातील अयोध्यावासियांचा भक्तीभाव अन् पृथ्वीवरील सात्त्विक वातावरण यांमुळे ‘प्रभू श्रीरामाच्या जन्माच्या घटनेचा परिणाम १०० टक्के झाला होता. त्यानंतर प्रत्येक वर्षी येणार्‍या चैत्र शुद्ध नवमीला ब्रह्मांडातील वातावरणात रामतत्त्वाचे प्रक्षेपण करून वातावरण सात्त्विक आणि चैतन्यमय बनवण्यासाठी विष्णुलोकातून श्रीरामतत्त्वयुक्त विष्णुतत्त्व भूलोकाच्या दिशेने प्रक्षेपित होते आणि त्या दिवशी श्रीरामाचा अंशात्मक जन्म होतो. त्याचा परिणाम वर्षभर होऊन ब्रह्मांडात रामतत्त्वयुक्त सात्त्विकता आणि चैतन्य यांचे प्रक्षेपण होते. रामतत्त्वयुक्त सात्त्विकता आणि चैतन्य ब्रह्मांडातील प्रत्येक सजीव आणि निर्जीव ग्रहण करतात आणि त्यामुळे ते त्यांचे कार्य चांगल्या प्रकारे करू शकतात.
आ. रामनवमी, हनुमान जयंती, जन्माष्टमी, दत्तजयंती यांचे महत्त्व
स्थितीचे कार्य सुलभरीत्या सुरू रहाण्यासाठी रामनवमी, हनुमान जयंती, जन्माष्टमी आणि दत्तजयंती या तिथींना श्रीविष्णूचे तत्त्व विष्णुलोकातून प्रक्षेपित होऊन ब्रह्मांडात कार्यरत होते.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email