राज्यात तब्बल २४ लाख नोकऱ्यांची पदे रिक्त आहेत मात्र ती पदे भरण्यासाठी सरकारकडे पैसा नाही – राज ठाकरे

नवी मुंबई दि.०६ – राज ठाकरे यांनी त्यांच्या मिश्‍कील शैलीत पंतप्रधान व सरकारकडून केल्या जाणाऱ्या घोषणांच्या पावसाची टर उडवली. देशातील परिस्थिती हाताळण्यापेक्षा नरेंद्र मोदी योगा करत बसले आहेत. योगा झाला की बॅग घेतली आणि विमानतळावर गेले, असा चिमटा त्यांनी काढला. सध्या देशात भाजप सरकारकडून हजारो नाही तर लाखो-कोट्यवधी रुपयांच्या घोषणा केल्या जात आहेत. या निमित्ताने मनसेकडून नवी मुंबईसाठी ५० हजार कोटी रुपये जाहीर, असे म्हणून ठाकरे यांनी टर उडवली. सत्य परिस्थिती दाखवणाऱ्या प्रसारमाध्यमांची सरकारकडून मुस्कटदाबी सुरू आहे. आम्ही दाखवतो तेच पहा, आधी काय झाले ते विसरून जा, असे संमोहन करण्याचे प्रकार देशात सुरू आहेत. मात्र मी सर्वांचे उकरून काढून तुम्हाला सांगणार आहे, असे ठाकरे यांनी सांगितल्यावर सभागृहात एकच हशा पिकला.

एका बाजूने आंदोलने पेटवायची, गुन्हे दाखल करायचे आणि मुलांचे आयुष्य उद्‌ध्वस्त करायचे, अशी खरमरीत टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी सरकारवर केली. आरक्षणासाठीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या तब्बल साडेसात हजार मराठी मुलांवर ३०७ कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. उद्या आरक्षण मिळाले तर त्यांना नोकऱ्या मिळतील का? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेनेच्या वतीने वाशीच्या विष्णूदास भावे नाट्यगृहात आयोजित कामगार मेळाव्यात ते बोलत होते.

राज्यात तब्बल २४ लाख नोकऱ्यांची पदे रिक्त आहेत; मात्र ती पदे भरण्यासाठी सरकारकडे पैसा नाही किंवा ती पदे भरावीत असे सरकारला वाटत नाही. एवढी पदे रिक्त आहेत, तर मग आरक्षणासाठी टाहो का, असा पुनरुच्चार राज यांनी केला. आंदोलनादरम्यान पकडलेल्या मुलांमध्ये परप्रांतीय मुले आहेत; मात्र बदनाम मराठी मुले होत आहेत. त्यामुळे आंदोलने करायची असतील, तर स्वतःच्या मनगटाच्या जोरावर करा, असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला. महापालिकांना १६८७ पासूनचा इतिहास लाभला आहे, हे सांगताना ठाकरे यांनी देशातील प्रथम स्थापन झालेल्या मद्रास महापालिकेचे उदाहरण दिले. महापालिकेत काम करत असतानाही अधिकारी, कर्मचारी व मजुरांनी मराठी नागरिकत्व राखले पाहिजे, कुठे काही चुकीचे घडत असेल तर तुमच्या युनियनला सांगितले पाहिजे. जेणेकरून शहरातील परप्रांतियांचे लोंढे कमी होऊन वेडीवाकडी वाढ झालेल्या शहरांना लगाम लागेल, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email