‘राज्यस्तरिय फोकस पेपर 2018-19’ चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विमोचन

नाबार्डच्या वतीने मुंबई येथे आयोजित राज्यस्तरिय क्रेडिट सेमिनारला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबोधित केले. नाबार्डचे महाप्रबंधक एम. के. श्रीवास्तव, एसएलबीसीचे अध्यक्ष रवींद्र मराठे आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. ‘राज्यस्तरिय फोकस पेपर 2018-19’ चे यावेळी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी विमोचन केले. ‘जलसंवर्धन- पर ड्रॉप मोर क्रॉप’ ही या फोकस पेपरची मध्यवर्ती संकल्पना असून, त्यात शाश्वत सिंचन, मूल्यवर्धन, शेती तंत्रज्ञान आणि शेतकर्‍यांना संस्थात्मक परपुरवठ्याच्या कक्षेत आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर यावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. एरिया डेव्हलपमेंट स्कीम आणि ई-शक्ती यावर आधारित पुस्तिकांचे विमोचन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. नाबार्डच्या ई-शक्ती कार्यक्रमांतर्गत महिला बचत गटांचे डिजिटायझेशन करण्यासाठी प्रातिनिधीक स्वरूपात काही गटांना उपकरणांचे वाटप यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा फोकस पेपर प्रत्यक्षात अंमलात येईल, याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. ई-शक्ती अभियानासाठी नाबार्डचे मी अभिनंदन करतो. विकासाचे फळं समाजातील तळागाळापर्यंत पोहोचायला हवी, यासाठी सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे. राज्यात आपण शाश्वत सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणीसाठे तयार करतो आहोत. पण, पाण्याचा सुयोग्य वापर यावर सुद्धा लक्ष केंद्रीत करायला हवे. प्रत्येक योजनेच्या आणि माहिती संकलनाच्या डिजिटायझेशनकडे लक्ष द्यायला हवे. त्याआधारावर योजना निर्धारित करणे आपल्याला अधिक सोयीचे होईल. या ‘फोकस पेपर’चा वेळोवेळी आढावा घेण्यात यावा, अशीही अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email