राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आदेशाला केराची टोपली,डोंबिवलीतील इंदिरा चौकातील विकास काम रखडले
शहरात रस्त्यांची कामे अतिशय धीम्या गतीने,पूर्व-पश्चिमकडील वाहतुकीवर परिणाम,वाहतूक कोंडीची समस्या अधिक तीव्र
(श्रीराम कांदु)
डोंबिवली- हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी मान्सूनचे आगमन लवकर होणार आहे. शहरात रस्त्यांची कामे सूरू असून ती अतिशय धीम्या गतीने होत आहेत. पूर्व-पश्चिमकडील वाहतुकीवर याचा परिणाम होत असून वाहतूक कोंडीची समस्या अधिक तीव्र,होत आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी महापालिका डोंबिवली विभागीय विकास कामावर भर देणाऱ्या विविध प्रस्तावाचे आदेश पालिका अधिकाऱ्यांना दिले. मात्र असे असले तरी कामचुकार अधिकारी कामांना केराची टोपली दाखवत आहेत.
पूर्वेकडील इंदिरा चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राज्यमंत्री चव्हाण यांनी महापालिका अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, शहर वाहतूक पोलीस, पालिका परिवहन अधिकारी यांना बरोबर घेऊन पाहणी दौरा केला. दौऱ्यादरम्यान प्रत्यक्ष कशा पद्धतीने काम करायला पाहिजे याचा आराखडा सर्वांसमोर ठेवला. इंदिरा चौकात वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी परिवहन उपक्रमाच्या बसेस नेहरू रोड गार्डन येथे थांबवून बसच्या वेळापत्रकाप्रमाणे पाच मिनिटपूर्व बाजीप्रभू चौकातील थांब्यावर आणाव्या. पाटकर प्लाझा इमारतीतील तळ अधिक पहिला मजला रिक्षा वाहनतळ म्हणून उपयोगात आणावा. इंदिरा चौकातील खडबडीत उचंटप्पा असणाऱ्या रस्त्याचे सपाटीकरण करून रस्ता चांगल्या प्रकारे तयार करण्यात यावा. अनधिकृत रिक्षा थांबे हटवून अनेक मार्गांसाठी एक रिक्षा थांबा असे आदेश दिले होते. या प्रस्तावातील एक प्रस्ताव म्हणजे इंदिरा चौकातील खडबडीत उचंटप्पा असणाऱ्या रस्त्याचे काम पालिका अधिकाऱ्यांनी सुरु केले. इंदिरा चौकात पेवरब्लॉक लावून ते काम अर्धवट अवस्थेत पडलेले आहे. रस्ता उकरण्यात आला असून गेले पंधरा दिवस इंदिरा चौकात मोठी समस्या निर्माण झाली आहे. खणलेल्या रस्त्यात जेष्ठ नागरिक पडून जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. रस्ता बंद असल्याने वाहतूक कोंडी ही नित्याचीत बाबा झाली आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता काम चालू आहे रस्ता बंद असे सरकारी उत्तर मिळत आहे. परिवहन बसेसही कशाही पद्धतीने थांबविण्यात येत आहेत. वाहतूक पोलीस आम्ही काम करतो अशा भूमिकेत वावरत आहेत. डोंबिवली शहर स्मार्ट सिटी होणार या भ्रामक कल्पनेची अपेक्षा डोंबिवलीकर व्यक्त करीत असले तरी येथील सर्वच अधिकारी मात्र राज्यमंत्री चव्हाण यांचा विकास कामाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असल्याने डोंबिवलीकर हे सर्व सहन करत आहेत.