राजस्थानातील आठवीच्या पुस्तकात टिळकांचा घोर अवमान;हिंदु जनजागृती समितीचा आंदोलनाचा इशारा

लोकमान्य टिळकांचा हेतूतः‘दहशतवादाचे जनक’ म्हणून उल्लेख करणार्‍यांवर त्वरित कारवाई करा आणि संबंधित पुस्तक मागे घ्या !

राजस्थानमधील इंग्रजी माध्यमातील इयत्ता आठवीच्या समाजशास्त्र विषयाच्या संदर्भ पुस्तकात लोकमान्य टिळक यांचा ‘दहशतवादाचे जनक’, असा अवमानकारक उल्लेख करण्यात आला आहे. हिंदु जनजागृती समिती याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. भारतीय स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व बलीदान करणार्‍या लो. टिळकांचा अवमान आम्ही कदापी खपवून घेणार नाही. राज्यस्थान शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्या पुस्तकातील आक्षेपार्ह उल्लेख तात्काळ वगळावा, तसेच हा प्रकार नजरचुकीने झालेला नसून राष्ट्रपुरुषांचा अवमान करण्यासाठी हेतूतः लोकमान्य टिळकांचा असा उल्लेख करण्यात आला आहे. असा उल्लेख करणारे लेखक, ते छापणारे मुद्रक, प्रकाशक आणि संबंधित दोषी शासकीय अधिकार्‍यांवरही कठोर कायदेशीर कारवाई करावी, संबंधित पुस्तक त्वरित मागे घ्यावे आणि संबंधितांनी याविषयी जाहीर क्षमायाचना करावी, अन्यथा या विरोधात हिंदु जनजागृती समिती देशभरात आंदोलन छेडेल, असा इशारा हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र्रीय प्रवक्ते श्री.रमेश शिंदे यांनी दिला आहे.या संदर्भात राजस्थानच्या मुख्यमंत्री श्रीमती वसुंधराराजे सिंधीया यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. तसेच जोधपूर आणि जयपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

या आधीही केंद्रशासनाच्या ‘आयसीईएस’च्या पाठ्यपुस्तकातून बाळ गंगाधर टिळक, लाला लजपतराय, बिपीनचंद्र पाल, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु आदी थोर स्वातंत्र्यसैनिकांचा‘आतंकवादी’ म्हणून जाणीवपूर्वक उल्लेख करण्यात आला होता. त्याला विरोध झाल्यावर तत्कालीन शासनाने तो भाग पुस्तकातून वगळला होता. आता पुन्हा टिळकांना आतंकवादी ठरवणे, हे राष्ट्र्रपुरुषांना अवमानित करून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचे मोठे षड्यंत्र आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात तत्कालीन जनतेने स्वातंत्र्य लढ्यात उतरावे म्हणून लोकमान्य टिळक यांनी आपल्या ओजस्वी वाणीने भारतीय जनतेत स्वातंत्र्याचे स्फुलिंग तेजवले. जनता स्वातंत्र्य लढ्यात अग्रेसर झाली. त्यामुळे इंग्रजांनी टिळकांना‘फादर ऑफ इंडियन अनरेस्ट’ अर्थात् ‘भारतीय असंतोषाचे जनक’ म्हणून विशेषण दिले. असे असतांना टिळक यांना ‘दहशतवादाचे जनक’ (फादर ऑफ टेररिझम) म्हणणे, हे देशद्रोही कृत्यच म्हणावे लागेल. असेही रमेश शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email