रस्त्यावर ओतणाऱ्या दुधात पाणी किती आणि दूध किती, याची मला माहिती आहे – सदाभाऊ खोत
मुंबई दि.१८ – राज्यात दूधदर वाढीसाठी आंदोलन सुरू असताना ‘ रस्त्यावर जे दूध ओतले जाते त्यात दूध किती व पाणी किती, याची माहिती मला आहे. तीस वर्षे मी स्वत: अनेक आंदोलनं केली आहेत.‘ असे वक्तव्य केल्याने पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केल्याने शेतकरी संघटना व विरोधी पक्षात संताप व्यक्त होत आहे.
कॉग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी हा शेतकऱ्यांच्या भावनांचा अनादर आहे. शेतकऱ्यांबद्दल सदाभाऊंचे बेगडी प्रेम उघड झाले आहे,अशी टीका केली आहे.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं खोत यांच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी खोत यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत, सत्तेच्या मस्तीत रमलेल्यांकडून शेतकऱ्यांविषयी चांगले शब्द येवूच शकत नाहीत. शेतकऱ्यांवर दाखवलेला हा अविश्वास आहे. खोत यांच्या मनातील शेतकरी संपला आहे. स्वत: सत्तेची मलाई चाखणाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या दुधाचा हिशोब करू नये, अशा शब्दात तुपकर यांनी हल्ला चढवला.
सरकारसोबत चर्चा करण्यास स्वाभिमानी तयार आहे. मात्र ज्यांना निर्णयाचा अधिकार आहे त्यांनी चर्चेला यावे. बाकीच्यांनी मधे लुडबुड करू नये, असा टोलाही तुपकर यांनी खोत यांचे नाव न घेता लगावला.