रविवारी उलगडणार सूर्यवंशी भगिनींचा प्रेरणादायी प्रवास ; महिला दिनानिमित्त अमृतवेल फाउंडेशनतर्फे आयोजन

ठाणे –  उत्तर महाराष्ट्रातील धुळ्यासारखा जिल्हा… शिक्षक आईवडील…. तीन बहिणी… मागास, आदिवासी बहुल दुर्गम भागात झालेलं मराठी माध्यमातील शिक्षण…. तिघीनी आई वडिलांच्या प्रोत्साहनाच्या जोरावर प्रशासकीय सेवेचा मार्ग निवडला. एकाच घरातील या तिघी प्रशासनाच्या अत्यंत महत्वाच्या पदावर समर्थपणे सेवा बजावत आहेत. वंदना, नीलिमा आणि माधवी सूर्यवंशी या तीन बहिणींची अद्भुत आणि प्रेरणादायी यशोगाथा महिला दिनाच्या निमित्ताने रविवारी ११ मार्च रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे सकाळी ११. ०० वाजता उलगडणार आहे.

अमृतवेल फाउंडेशन तर्फे या तीन बहिणींच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.वंदना सूर्यवंशी या ठाण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी असून धडाकेबाज अधिकारी म्हणून लोकप्रिय आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी पदावर काम करणाऱ्या त्या राज्यातील एकमेव महिला अधिकारी आहेत. एमएमआरडीए, निवडणूक निर्णय अधिकारी, रेशनिंग अधिकारी आणि आता ठाण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी असा त्यांचा प्रवास आहे. भूसंपादन, निवडणूक निर्णय, रेशन कार्ड वितरण आदी विषयांत त्यांनी ठाम भूमिका घेत स्वतःचे वेगळेपण अधोरेखित केले आहे. कुणाचाही दबाव न जुमानता नियमांवर बोट ठेऊन काम करणारी अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

नीलिमा सूर्यवंशी यांचा नायब तहसीलदार म्हणून त्यांचा प्रशासनात प्रवेश झाला. भिवंडीत पुरवठा अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. कुर्ल्यासारख्या संवेदनशील भागात अतिक्रमण विरोधी अधिकारी म्हणूनही त्यांनी धडक काम केले आहे. कर्तव्य कठोर तरीही माणुसकीचा हळवा कोपरा जपणारी अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. महिला अधिकार्‍यांचे हक्क, त्यांना मिळणार्‍या सुविधा यासाठी त्या आग्रही आहेत. सध्या झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणामध्ये तहसीलदार म्हणून त्या सेवा बजावत आहेत.

माधवी सूर्यवंशी गट विकास अधिकारी म्हणून त्यांची कारकिर्दी सुरु झाली. कुपोषणासंदर्भात त्यांनी केलेले काम अविस्मरणीय आहे. नंतर त्यांची विक्री कर विभागात निवड झाली. सहायक विक्रीकर आयुक्त आणि आता विक्रीकर उपयुक्त असा त्यांचा प्रवास आहे. सध्या त्या नव्या अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्याचे काम करतात. विशेष म्हणजे हे काम त्यांनी स्वतःहून मागून घेतलेआहे.एकाच घरातील तिघी बहिणी प्रशासनात जाण्याचा हा दुर्मिळ योग. या तिघींचे घडवणारे त्यांचे आई वडील, त्यांचे बालपण, शिक्षण, प्रशासनात त्यांनी केलेले त्यांचा संघर्ष असा लखलखता प्रवास ११ मार्च रोजी ठाण्यात उलगडणार आहे.

ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या वेगळ्या वाटेवरच्या मुलाखतीचा लाभ घ्यावा. असे आवाहन अमृतवेल फाउंडेशनचे अध्यक्ष धर्मेंद्र पवार यांनी केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email