योगेश पवार यांची तक्रार सोलापूर पोलिसांनी फेटाळली
आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना ही अर्जदाराला बँकेने मंजूर केलेल्या कर्जाच्या व्याजाच्या परताव्याबाबत असल्याने व योगेश पवार यांना कोणत्याही बँकेने कर्ज मंजूर केलेले नसल्याने सोलापूर पोलिसांनी त्यांची तक्रार फेटाळली आहे.
छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष असलेले पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे सहकारी मंत्री चंद्रकांतदादा पाटील, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, गिरीष महाजन, सुभाष देशमुख व संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात सोलापूर पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार अर्ज दाखल केला होता.
या अर्जाची शहानिशा करून पोलिसांनी कायदेशीर मत घेतल्यानंतर फेटाळण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून असे स्पष्ट होते की सदरील योजना पात्र व्यक्तीला मंजूर झालेल्या कर्जावरील व्याज परताव्याबाबतची आहे. अर्जदाराला बँकेचे कर्ज मंजूर झाल्यानंतर ही योजना निकषांनुसार लागू होते.
याबाबतची वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे आहे-
पवार यांनी कोणत्याही बँकेकडून कर्ज घेण्याआधीच राज्य शासनाच्या उद्योग विभागाच्या वेबसाईटवरून व्याज परतावा पात्रता प्रमाणपत्र मिळविले. त्याचा आधार घेऊन त्यांनी कर्जाची मागणी केली. वस्तुतः त्यांनी बँकेच्या पात्रता निकषानुसार कर्ज मंजूर झाल्यानंतर व्याज परताव्याचा लाभ मिळविण्यासाठी महामंडळाकडे संपर्क साधने अपेक्षित होते.
मात्र कर्ज न मिळाल्याने त्यांनी जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्याकडे तक्रार केली होती. या अर्जावर जिल्हा अग्रणी बँक यांचे मत घेण्यात आले असता त्यांनी कर्ज मंजूर करणे वा ना करणे हा त्या त्या बँकेच्या अधिकार कक्षेतील विषय असल्याचे व कर्ज देण्याची सक्ती करण्याचे अधिकार अग्रणी बँकेला नसल्याचे सांगितले.
वस्तुतः आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची योजना पात्र अर्जदाराने बँकेकडून कर्ज मंजूर करून घेतल्यानंतर कर्जाच्या रकमेवर बँकेकडून आकारल्या जाणाऱ्या व्याजाचा १२ टक्के दराने व्याज परतावा महामंडळाने देण्याबाबतची आहे. नॉन क्रिमी लेयरसाठीच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत असलेल्या व बँकेने दहा लाख रुपये मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या उमेदवाराने कर्जाचे हप्ते वेळेवर भरल्यास व्याजाची रक्कम महामंडळामार्फत थेट बँकेत जमा होते.
याबाबत पोलिसांनी विधि अधिकाऱ्यांचे मत घेतले असता यात कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा होत नाही, असा अभिप्राय दिला आहे.