मोबाईलची चोरी करणाऱ्या दोन टोळ्या जेरबंद, साडेपाच लाखरुपयांचे मोबाईल हस्तगत
नाशिक – मोबाईलची चोरी करणाऱ्या दोन टोळ्यांना नाशिक पंचवटी पोलिसांनी अटक केले आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून १०९ मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत.या मोबईलची कींमत सुमारे साडेपाच लाख रुपये एव्हढी आहे.
शहर परिसर तसेच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी दिवसा व रात्रीच्या वेळी दुचाकीवरून जाणाऱ्या तसेच पायी जाणाऱ्या नागरिकांना रस्त्यात गाठून शस्त्राचा धाक दाखवून मोबाईल लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. शहरातील अनेक ठिकाणच्या आठवडे व दैनंदिन बाजारातही मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले होते. या मोबाईल चोरट्यांचा तपास करत असतानाच काही दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांना या संदर्भात संशयितांची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शहरात वेगवेगळ्या भागात सापळा रचून सुनील नागू गायकवाड, संपत लक्ष्मण वाघ व विकी ऊर्फ गट्ट्या संजय जाधव यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने मोबाइल चोरीची कबुली दिली.पोलिसांनी अटक केलेल्या टोळीतील दोन संशयित पसार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या टोळीतील काही संशयीत आरोपी हे कुख्यात गुन्हेगार आहेत. त्यामुळे शहरात घडलेल्या अन्य गुन्ह्याची देखील उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.