मुल होत नसल्याच्या रागातून विवाहितेला रॉकेल ओतून जाळले
पत्नीला बाळ होत नाही या रागातून पती आणि त्याच्या दोघी बहिणींनी विवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कदायक घटना घडली. भिवंडीतील रहेमतपुरा, शांतीनगर येथे ही घटना शनिवारी घडली. या घटनेत पीडित विवाहिता गंभीररित्या भाजली आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
अमिना नसरुद्दीन खान (२१) असे जिवंत जाळण्यात आलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी अमिना हिचा पती नसरुद्दीन (२८) आणि नणंद ताहिरा उर्फ शबीना खान (२४) या दोघांना अटक केली तर जरीना ही नणंद फरार आहे. जखमी अमिनावर ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असून तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे.
भिवंडीतील रहेमतपुरा परिसरात राहणारी अमिना हिचा १० महिन्यांपूर्वीच नसरुद्दीन याच्याशी निकाह झाला आहे. मात्र, निकाह होऊन १० महिने होऊनही ती गर्भवती राहून बाळाला जन्म देत नाही. यावरून पती नसरुद्दीन आणि विविहीतेच्या २ नणंदा जरीना व ताहिरा या तिघांनी संगनमताने तिला वारंवार शिवीगाळ करून शारिरीक व मानसिक त्रास देवून तिचा छळ सुरू केला होता.
शनिवारी रात्रीच्या सुमाराला याच कारणावरून पतीने भांडण करून पीडित विवाहितेला मारहाण केली. त्यावेळी नणंद ताहिरा हिने अमिना हिच्या अंगावर रॉकेल ओतले तर जरीना हिने भाऊ नसरुद्दीन यास आगपेटीच्या काडीने पेटवून देण्यास सांगितले. त्यानुसार आरोपी पतीने पत्नी अमिनाला पेटवून दिले. आगीच्या भडक्यात सापडलेली अमिना जीव वाचवण्यासाठी टाहो फोडत होती. त्यावेळी तिचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेवून तिला प्रथम स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र ती ४८ टक्के जळाल्याने तिची प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
या गंभीर घटनेचा पोलीस ठाण्यात पती नसरुद्दीन खान, नणंद ताहिरा व जरीना या तिघांच्या विरोधात जखमी अमिनाच्या जबानीवरून भादवी. कलम ३०७, ४९८ (अ) ३२३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच एपीआय संतोष बोराटे यांनी अमिना हिचे पती नसरुद्दीन व नणंद ताहिरा उर्फ शबीना खान या दोघांना अटक करून रविवारी न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने आरोपींना ४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
साभार – ABI news,