मुलगी होण्याच्या भीतीने पतीचा दुसरा विवाह
पुणे – आपला देश अनेक क्षेत्रांत यशस्वी झेप घेत असतानाच ‘स्त्री’ बद्दल असलेली समाजाची मानसिकता मात्र बदलताना दिसत नाही. वाकड परिसरात घडलेल्या अशाच एका धक्कादायक प्रकरणात मुलगी होण्याच्या भीतीने पतीने पहिल्या पत्नीच्या मर्जीविरुद्ध दुसरे लग्न केले. त्यानंतर दिराने एकाकी पडलेल्या वाहिनीसोबत अश्लील वर्तन केले. या सर्व प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने पोलिसात धाव घेत तक्रार दिल्याने हा सगळा प्रकार समोर आला.
याप्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहित महिलेने वाकड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली असून, त्यानुसार पोलिसांनी पीडितेच्या पती, सासू, सासरा आणि दिरावर गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिलेला पहिली मुलगी झाल्याने तिचे सासरचे तिच्यावर नाराज होते. त्यानंतर पुन्हा गर्भवती असलेल्या पीडितेला दुसऱ्या वेळीही मुलगीच होणार या भीतीने पती आणि सासरच्या मंडळींनी तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले. तसेच तिला कधीही मुलगा होणार नसल्याचे गृहीत धरून सासरच्या मंडळींनी महिलेची संमती नसताना तिच्या पतीचा दुसरा विवाह लावला आणि महिलेवर घटस्फोट घेण्यासाठी दबाव आणला.
त्यानंतर घडलेल्या प्रकाराने छळाची हद्दच ओलांडली. महिलेच्या एकाकीपणाचा फायदा घेत तिच्या दिराने तिच्याशी अश्लील वर्तन केले. त्यानंतर महिलेने माहेरच्या मंडळींच्या मदतीने वाकड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.