मुरबाड तालुक्यातील जंगलात बिबट्याचा पुन्हा वावर,बिबट्याच्या हल्ल्यात आदिवासी गंभीर जखमी
मुरबाड – तालुक्यातील जंगलात बिबट्याचा पुन्हा वावर वाढल्याचा प्रकार समोर आला आहे. जंगलात आपल्या कुटुंबासह आंबे तोडण्यासाठी गेलेल्या आदिवासीवर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव बबन राघो ढूले (३८) असून त्याला उपचारासाठी उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. बहुतेक हाच हल्लेखोर बिबट्या वन विभागाने जंगलात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे.
मुरबाड तालुक्यातील चिल्लरवाडी गावात राहणारा बबन हा जंगलातील आंबे, जांभूळ, करवंद विकून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतो. रोज प्रमाणे तो रविवारी दुपारच्या सुमाराला तालुक्यातील साजई जंगलात आंबे तोडण्यासाठी पत्नी व मुलासह गेला होता. बबन आंबे तोडून झाडावरून उतरत असतानाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला. यावेळी बबनच्या पत्नी व मुलाने जोरात आरडाओरडा केल्याने बिबट्या घटनास्थळावरून पसार झाला. बिबट्याच्या हल्ल्यात बबनच्या पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचे अधिकारी रमेश रसाळ, चंद्रकांत शेळके, पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमी बबनला मुरबाडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र जखमा गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी १०८ क्र. च्या रुग्णवाहिकेतून बबनला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुरबाड तालुक्यातील मडकेपाडा व साजईच्या जंगलात वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात एक बिबट्या कैद झाला आहे. यामुळे माडकेपाडा, साजई, शिरवली, भुवन येथील गावकऱ्यांना सावधानतेचा इशारा वनविभाग व जिल्हा प्रशासनाने दिला आहे. या बिबट्याचा नागरी वस्तीजवळ संचार असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र गावकऱ्यांनी घाबरून न जाता सावधानता बाळगावी व काळजी घ्यावी. असे आवाहन वन अधिकारी व पोलिसांनी केले आहे. ह्याच बिबट्याने बबनवर हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.