मुकुंदनगरची ‘अंडा गँग’ राजकीय आश्रयाच्या बळावर
नगर – चाळीसहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या मुकुंदनगरमधील अंडा गँगविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करावी, अशी मागणी मुकुंदनगरमधील नागरिकांनी केली आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिस कारवाई करण्याचे टाळत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
आर्किटेक्ट अर्शद शेख यांच्यासह मुकुंनगरमधील नागरिकांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांसह सर्व संबंधितांना निवेदन दिले आहे. यामध्ये या गँगबद्दल माहिती आणि त्यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यांची यादी आणि संदर्भासाठीची कागदपत्रेही देण्यात आली आहेत.
यामध्ये म्हटले आहे, ‘मागील तीन वर्षांपासून आम्ही मुकुंदनगरकर अंडा गँग या कुख्यात टोळीविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी पाठपुरावा करीत आहोत; मात्र, पोलिस दखल घेत नाहीत. त्यामुळे टोळीच्या कारवाया सुरूच आहेत. पोलिस अधीक्षक कार्यालयावर झालेला हल्ला आणि अलीकडेच मुकुंदनगरमधून एका विवाहितेचे झालेले अपहरण या घटनांमुळे ही गँग पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
या टोळीतील जैद रशिद सय्यद ऊर्फ टाईप्या याच्याविरुद्ध महिलेच्या अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल असून तो फरारी आहे. एसपी ऑफिसवरील हल्ल्याचा गुन्हा दाखल असलेला समदखान वहाबखानही फरारी आहे. राजकीय आश्रयाच्या बळावर ही टोळी कार्यरत आहे.
त्यांची दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे. खुनाचा प्रयत्न, दरोडा, विनयभंग, खंडणी, अवैध शस्त्र बाळगणे, लूटमार असे अनेक प्रकारचे गुन्हे टोळीतील गुंडाविरुद्ध दाखल आहेत. टोळीचे प्रमुख आणि अन्य सदस्य यांच्यावर सुमारे ४० गुन्हे दाखल आहेत. तरीही त्यांच्यावर ठोस कारवाई केली जात नाही.
काही जणांवर तडीपारीची कारवाई झाली असली तरी त्यांचा याच भागात वावर असतो. या टोळीकडे मोठ्या प्रमाणात शस्त्र आहेत. तरुणांना वाम मार्गाला लावून अवैध व्यवसाय व गुंडगिरी करून घेतली जाते. काही नेत्यांना येथून गुंडांची रसद पोहचत असल्याने ते यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यावर कायद्याचा वचक राहिलेला नाही.