मुंब्रा बायपास दुरूस्तीमुळे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा हस्तक्षेप
(म.विजय)
ठाणे – मुंब्रा बायपास रस्त्याच्या दुरुस्तीचे काम १६ एप्रिलपासून सुरू होणार असून त्यासाठी एमएमआरडीए, पीडब्ल्यूडी, नॅशनल हायवे तसेच, ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, मुंबई, नवी मुंबई आदी महापालिकांनी त्यांच्या अखत्यारितील सर्व रस्त्यांची युद्धपातळीवर डागडुजी करून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे दिले.
जेएनपीटीमधून सोडण्यात येणाऱ्या कंटेनरमुळे वाहतुकीवर येणारा प्रचंड ताण टाळण्यासाठी ही वाहतूक दुरुस्तीच्या कालावधीत केवळ रात्रीच्या वेळी सुरू ठेवण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच दिवसा थांबविण्यात येणाऱ्या या वाहनांच्या पार्किंगसाठी नवी मुंबईतील सिडको तसेच मनपाच्या ट्रक टर्मिनलच्या रिक्त जागा तात्पुरत्या वापरासाठी देण्याची शिंदे यांची सूचना सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी मान्य केली.
आयजीपीएल कंपनी ते खोणी सर्कल हा तळोजा एमआयडीसीतून जाणारा रास्ता,चक्कीनाका ते नेवाळी फाटा हा श्रीमलंगगड रस्ता तसेच, गोविंदवाडी बायपास आदी कामे जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
बायपास दुरुस्तीचे काम जवळपास दोन महिने चालणार असून त्यासाठी जेएनपीटी, नवी मुंबई, ठाणे येथील प्रशासकीय व पोलिस अधिकाऱ्यांनीवाहतुकीचे नियोजन करण्यासाठी लवकरच एकत्रितपणे बैठक घेऊन त्यानुसार वाहतुकीच्या नियोजनाची आगाऊ प्रसिद्धी वाहनचालकांसाठी करावी,असेही शिंदे यांनी सांगितले.
शिळफाटा, मुंब्रा बायपास रस्त्यांची दुरुस्ती व रुंदीकरणाच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचे योग्य व्यवस्थापन करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन शिंदे यांच्या मंत्रालयीन दालनात करण्यात आले होते. यावेळी एमएमआरडीएचे मुख्य अभियंता राजेंद्र घाडगे, सार्वजनिक बांधकाम अवर सचिव प्रवीण पाटील, ठाणे कार्यकारी अभियंता गांगुर्डे, ठाणे निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील, ठाणे पोलिस उपायुक्त अतुल काळे, नवी मुंबई पोलिस उपायुक्त नितीन पवार, ठाणे ग्रामीण वरिष्ठ पोलिस निरीक्षक कसबे आदी अधिकारी उपस्थित होते.