मुंबईच्या रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंग प्रश्न विकास नियोजनामध्ये नविन वाहनांबाबत धोरण ठरवा
मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी पत्राद्वारे केली विनंती
मुंबई – मुंबईतील रस्त्यांवरील वाढत्या अनधिकृत पार्किंगचा प्रश्न जटील होत असून हा प्रश्न सोडविण्यासाठी विकास नियोजनामध्ये नवीन वाहनांबाबत धोरण ठरविण्यात यावे. अशा पार्किंगवर आळा घालण्यासाठी वाहतुक विभागाला पुरेसे मनुष्यबळ तसेच यंत्रणा देण्यात यावी, अशी सूचना गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.
मुंबईच्या रस्त्यांवर दिवसें दिवस नव्याने येणार्या वाहनांमुळे मुंबई शहर तसेच उपनगरांमध्ये वाहतुकीच्या कोंडीत वाढ होत आहे. मुंबई शहर स्मार्ट प्रकल्पात समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र मुंबईची वाहतूक समस्या जटील होत आहे. मुंबई शहर तसेच उपनगरातील असलेले अरुंद रस्ते, रस्त्यावरच असणारी अनधिकृत बांधकामे, गॅरेजेस यामुळे वाहतूक व्यवस्थेवर कमालीचा ताण पडत आहे. त्यामुळे वाहनचालकांना काही मिनिटांच्या प्रवासासाठी काही तास मोजावे लागत आहे. रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहचता येते नाही. दोन्ही बाजुने मोठया प्रमाणात बेजबाबदारपणे उभी असणारी वाहने संपूर्ण मुंबईची वाहतूक व्यवस्थाच बिघडविण्यास कारणीभूत ठरत असल्याचे मतही वायकर यांनी पत्रात व्यक्त केले आहे.
याप्रश्नी वाहतूक विभागाकडे तक्रार करुनही पुरेसे मुनष्यबळ व यंत्रणा उपलब्ध नसल्याचे कारण वाहतूक विभागाच्या अधिकार्यांकडून देण्यात येत असल्याचे, त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले आहे. रस्त्यावर अनधिकृत पार्किंग करणार्यांवर नुसती दंडात्मक कारवाई हा प्रश्न सुटणार नाही तर त्यासाठी विकास नियोजनामध्ये नविन वाहनांबाबत धोरण ठरवावे लागेल, अशी सूचनाही वायकर यांनी केली. अनधिकृत पार्किंगला आळा घालण्यासाठी वाहतूक विभागास पुरेसे मनुष्यबळ व यंत्रणा देणे काळाची गरज असल्याचे मतही वायकर यांनी मांडले आहे. त्यामुळे मुंबईतील महत्वाच्या मुख्य रस्त्यांवर अनधिकृतरित्या उभ्या असणार्या वाहनांवर उचित ती प्रभावी उपाययोजना करण्याबाबत संबंधित विभागाला आदेश देण्यात यावेत, अशी विनंतीही राज्यमंत्री वायकर यांनी लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री यांना केली आहे.