मुंबईच्या भक्ताकडून साईचरणी हिरेजडीत मुकुट अर्पण
शिर्डी दि.२६ – साईसमाधी शताब्दी वर्षात साईचरणी देणग्यांचा ओघ सुरूच असून, शुक्रवारी मुंबईतील एका अज्ञात साईभक्ताने साईबाबांना ७८० ग्रॅमचा २२ लाख रूपयांचा मुकुट अर्पण केला आहे. मध्यान्ह आरतीवेळी सुंदर नक्षिकाम असलेला हा हिरेजडीत मुकुट साईबाबांच्या मुर्तीवर चढविण्यात आला.
साईबाबांना सोने, चांदी, हिरे, माणिक यासह रोख रकमेचही करोडोंचे दान प्राप्त होते. सुवर्णहार आणि सुवर्ण मुकूटाचे दान इतर सोन्याच्या आभुषणांपेक्षा जास्त आहे. संस्थानकडे भाविकांनी दान स्वरुपात दिलले आजमितीला एक डझन मौल्यवान हार, तर दोन डझनांहून अधिक सोन्याचे मुकुट आहेत. आज दान स्वरूप मिळालेल्या मुकूटावर अमेरिकन डायमंडचा साज चढवण्यात आला असुन, ‘ओम’ची छबी रेखाटण्यात आली आहे. मुकूटाच्या वरच्या भागाला मोरपिसाने सजवण्यात आले आहे. दानशुर भाविकाच्या इच्छेनुसार हा मुकुट साईमुर्तीवर चढण्यात आला.
आगामी गुरूपोर्णिमा उत्सवादरम्यान हाच मुकुट मुर्तीला परिधान करण्यात येणार असल्याचे साईबाबा संस्थानकडून सांगण्यात आले आहे.