मीरा भाईंदर मध्ये मतदारांची रंगीत छायाचित्रे गोळा करणे सुरु
नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
ठाणे- गेल्या दोन वर्षांपासून १४५ मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघात मतदार नोंदणीचे काम सुरु आहे परंतु जानेवारी २०१८ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीत हजारो लोकांची छायाचित्रे उपलब्ध नाहीत किंवा कृष्णधवल छायाचित्रे लावली आहेत असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या मतदार संघात मतदारांची रंगीत छायाचित्रे गोळा करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु असून बूथ पातळीवरील अधिकाऱ्यांना या कामी सहकार्य करावे असे आवाहन निवडणूक नायब तहसीलदार जी पी भोईर यांनी केले आहे. सुमारे ३०० कर्मचारी हे काम करीत आहेत.
१४५ मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघात १ जानेवारी २०१९ अर्हता दिनांकावर आधारित प्रसिध्द झालेल्या यादीत १२१५ मतदारांची छायाचित्र कृष्णधवल आहेत त्याचप्रमाणे उर्वरित हजारो मतदारांची छायाचित्रेच टाकलेली नाहीत असे लक्षात आले आहे.त्यामुळे मतदार याद्या शुद्धीकरणाचा भाग म्हणून छायाचीत्र गोळा करण्याचे काम सुरु झाले असून प्रभाग १,२,३,४,५, व ६ मधील रंगीत छायाचित्रे गोळा करण्यात येत आहे. उप जिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम तसेच मतदार नोंदणी अधिकारी संदीप पवार ,मुकेश पाटील यांचे या मोहिमेस मार्गदर्शन मिळत आहे.