मार्च २०१९ पर्यंत पूर्ण करण्यासाठी ३०० राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची निश्चिती
नवी दिल्ली, दि.१४ – देशातल्या सध्या काम सुरु असणाऱ्या ७०० राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांपैकी मार्च २०१९ पर्यंत पूर्ण करण्यासाठी ३०० प्रकल्प केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने निश्चित केले आहेत. प्रदीर्घ आढावा घेतल्यानंतरच मंत्रालयाने हे प्रकल्प निश्चित केले. यापैकी १०० प्रकल्प येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली.
२० राज्यातल्या, एनएचएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ४२७ प्रकल्पांचा आणि एनएचआयडीसीएल अर्थात राष्ट्रीय महामार्ग पायाभूत विकास महामंडळाच्या ३११ प्रकल्पांचा दोन दिवसात आढावा घेण्यात आला. महाराष्ट्र आणि ईशान्येकडच्या राज्यांच्या प्रकल्पांचा आढावा अद्याप बाकी असून यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल असे गडकरी म्हणाले.
भूसंपादनासाठी पर्यावरणविषयक मंजुरी आणि वृक्ष तोडण्यासाठीच्या परवानगीतल्या विलंबामुळे महामार्ग प्रकल्पांना प्रामुख्याने विलंब होत आहे. यावर मात करुन प्रकल्पांना गती देण्यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यांनी केलेल्या कामगिरीची त्यांनी प्रशंसा केली.
देशांतल्या महामार्ग प्रकल्पातल्या अशा समस्यांच्या निराकरणासाठी नियमित आढावा आणि देखरेखीच्या गरजेवर गडकरी यांनी भर दिला.