महिलेची आपल्या अडीच वर्षांच्या मुलीसह आत्महत्या
टिटवाळा – एका महिलेने आपल्या अडीच वर्षांच्या मुलीसह आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी टिटवाळा येथे घडली. शोभा कोकणे (२५) आणि अडीच वर्षांची मुलगी आकांक्षा असे या मायलेकीचे नाव आहे.तिचा पती तिच्या चारित्र्यावर संशय घेवुन तिला शारीरिक व मानसिक त्रास द्यायचा . या त्रासाला कंटाळून तिने आत्याह्त्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
टिटवाळा येथील मांडा पश्चिमेला असलेल्या मनोरमा चाळीत संध्याकाळी पाणी आल्याने शेजारी राहणारे तिला पाणी भरण्यासाठी सांगण्यास गेले. मात्र तिने दरवाजा न उघडल्याने त्यांना संशय आला. त्यांनी याबाबत टिटवाळा पोलिस ठाण्याला माहिती दिली. टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी येऊन दरवाजा उघडला. यावेळी शोभा घराच्या छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली व हॉलमध्ये असलेल्या बेडवर अडीच वर्षांची तिची मुलगी आकांक्षा ही मृतावस्थेत आढळून आली. शोभाने आत्महत्येपूर्वी मुलीला गळा दाबून मारले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शोभाने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली. या चिठ्ठीत आपण आपल्या मुलीला सोबत घेऊन जात आहोत, असे तिने लिहिले. शोभाच्या वडिलांनी किसन कोकणे याच्याविरुद्ध टिटवाळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशी अंतर्गत किसनविरोधात पत्नी शोभाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून या घटनेचा अधिक तपास करत आहेत.