महिला वेटरची छेड काढून टोळक्याने फोडला बार खोणी फाट्यावरील घटना
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.०१- महिला वेटर्सशी छेडछाड करणाऱयांना विरोध केल्यामुळे मॅनेजरसह चौघा वेटर्सना बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण बदलापूर पाईपलाईन क्रॉस तळोजा रोडला खोणी फाट्यावर घडली. बारमध्ये तोडफोड करणाऱ्या हल्लेखोरांविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मॅनेजर प्रभाकर मोईली, विवेक सिंग , शिवकुमार भंडारी आणि दिनेश शेट्टी अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर डोंबिवलीतील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. खोनी गावा जवळ नाईट लव्हर्स नामक बार अँड रेस्टॉरंट आहे. या बारमध्ये लेडीज सर्व्हीस चालते. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास काही ग्राहक मद्यपान करत बसले होते. त्यातील काहीजण महिला वेटर्सची छेडछाड करू लागले. या महिलांसह इतर ग्राहकांना त्याचा त्रास होऊ लागला. पुढील अनर्थ टाळण्यासाठी मॅनेजर प्रभाकर मोईलीसह वेटर्सनी छेडछाड करणाऱ्यांना विरोध केला. बिल देऊन त्यांना बारमधून निघून जाण्यास सांगितले. त्यामुळे भडकलेल्या या टोळक्याने फोन करून त्यांच्या साथीदारांना बोलावून घेतले. लाठ्या-काठ्यांसह घुसलेल्या सशस्त्र टोळक्याने बारमध्ये तोडफोड करून मॅनेजर प्रभाकरसह वेटर्सवर हल्ला चढविला. दंगा झाल्याचे पाहून बारमधील इतर ग्राहकांनी बाहेर पळ काढला. हल्लेखोरांनी काही वेळाने बारबाहेर पळ काढला. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक करून बाकी आरोपींचा शोध सुरू केले आहे