महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण
पुणे – पुण्यातील कॅम्प भागातील महावीर रोडवर वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे एका महिलेला अडवण्यात आल्यामुळे या महिलेने तिला अडवणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली. तिच्या मदतीला आलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यालाही नियम मोडणाऱ्या महिलेने बदडलं आहे .सुरेखा साबळे या महावीर रोडवर तैनात होत्या. त्यांनी गीता परदेशी यांना लाल सिग्नल असतानाही दुचाकी दामटवताना बघितलं. नियम मोडल्याने साबळेंनी परदेशीला बाजूला घेतलं. याचा राग आल्याने परदेशीने साबळेंना शिव्या द्यायला सुरूवात केली आणि नंतर त्यांचे केस ओढत मारहाणही केली. साबळेंनी मदतीसाठी बघ्यांना विनंती केली, त्यातील एकाने साबळेंच्या सहकारी शुभांगी सुरवसे यांना बोलावलं. शुभांगी यांनी ही मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केला असता परदेशीने त्यांनाही मारहाण केली. साबळे आणि सुरवसे यांनी परदेशीविरोधात लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून तिला अटकही करण्यात आली आहे.