महाविद्यालयाचा विकास करताना विद्यार्थ्यांचे हित महत्वाचे -उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांचे मत

(सचिन झा )

 

महाविद्यालयातील उद्यानाच्या विकासासाठी रुपये १० लाखांचा निधी देणार

मुंबई :

इस्माईल युसूफ महाविद्यालयाचा विकास करताना कोणीही राजकारण न करता विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य दिले पाहिजे, असे स्पष्ट मत उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात केले.

इस्माईल युसूफ महाविद्यालयामधील विविध विकासकामांच्या उद्घाटनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री वायकर यांच्या बरोबरच, नगरसेवक बाळा नर, प्रविण शिंदे, रेखा रामवंशी, सहसंचालक काळे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्वाती वाव्हळ, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परदेशी, पोलिस अधिकारी उपस्थित होते.  या महाविद्यालायाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीमधून १० कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहेत. यातील तब्बल ३ कोटी रुपये खर्चुन उपहारगृह, भव्य रंगमंच तसेच जॉगिंग ट्रॅक बांधण्यात आला. यासाठी राज्यमंत्री वायकर यांनी सातत्याने बैठकाही घेतल्या होत्या. त्याचे उद्घाटन वायकर यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्याचबरोबरच महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांकरीता बांधण्यात येणार्‍या चांगल्या दर्जाच्या शुटींग रेंजचे भुमीपुजनही वायकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना ते म्हणाले की,‘महाविद्यालयाच्या परिसराचा विकास करताना अनेक वेळा विविध लोकांकडून राजकारण करुन अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु विद्येच्या मंदिराचा विकास करताना राजकारण न करता विद्यार्थी हिताला प्राधान्य देणे महत्वाचे आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. या महाविद्यालयातील विद्यार्थीनींच्या बैठया खोलीतील तसेच वसतीगृहातील सोयी-सुविधा निकृष्ट दर्जाच्या आहेत. त्याच्या देखील दुरुस्तीचे कामही सुरू असून ते लवकरच पुर्ण करण्यात  येईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

महाविद्यालयातील परिसरात तात्काळ सीसीटीव्ही बसविण्यात यावेत, असे निर्देश देतानाच वायकर म्हणाले की,‘कला, वाणिज्य तसेच विज्ञान शाखेची स्वतंत्र इमारत बांधण्यात येईल. या महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबत तसेच तासिका तत्वावर काम करणार्‍या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली असून लवकरच यात वाढ करण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमत्र्यांनी दिल्याचे वायकर यांनी यावेळी सांगितले. तसेच महाविद्यालयातील उद्यानाच्या सुशोभिकरणासाठी आमदार निधीतून १० लाख रुपये देण्यात येतील,असेही वायकर यांनी यावेळी जाहीर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्वाती वाव्हळ यांनी केले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email