महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच ; उद्धव ठाकरे
महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली असून महाराष्ट्र विधानसभेवर भगवा फडकणारच, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केलाय. ते शिवसेनेच्या ५२ व्या वर्धापन दिन सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक होत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्र्यांवरही टीकास्त्र सोडलं. पंतप्रधान मोदींचे दौरे, बुलेट ट्रेन, नाणारच्या मुद्द्यावरुनही उद्धव ठाकरे यांनी टीका केलीय.डिसेंबरमध्ये निवडणुका घेण्याचा डाव आहे, म्हणूनच पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत. काश्मीरमध्ये भाजपनं पीडीपीचा पाठिंबा काढून घेतला, त्याबद्दल अभिनंदन पण आता पाकिस्तानला चिरडून टाका, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय. पगडीच्या राजकारणावरुन उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवरही निशाणा साधलाय. पक्षाच्या ५२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत मुंबईत राज्यव्यापी शिबिरात ते बोलत होते.