महापालिकेच्या सभेतच दगडाने डोके फोडून घेण्याचा प्रयत्न
मनपा प्रशासनासमोर नगरसेविकेचे ‘डोकेफोड’
सांगली – प्रभागातील विकासकामांच्या प्रलंबित फायलींच्या प्रश्नावर नाराज झालेल्या मिरजेतील नगरसेविका सुरेखा कांबळे यांनी महापालिकेच्या सभेतच दगडाने डोके फोडून घेण्याचा प्रयत्न केला. अन्य महिला सदस्यांनी त्यांना रोखल्याने दुर्घटना टळली. आयुक्त रवींद्र खेबुडकरांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करीत महिला सदस्यांनी सभागृहातच ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे सभेत प्रचंड गदारोळ झाला.
महापालिकेची अंदाजपत्रकीय सभा शनिवारी महापौर हारुण शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या विषयपत्रिकेच्या वाचनास सुरुवात झाल्यानंतर नगरसेविका कांबळे यांनी त्यांच्या प्रभागातील विकासकामांच्या प्रलंबित फायलींचा मुद्दा उपस्थित केला. काही दिवसांपूर्वी त्यांनी याच प्रश्नावर आंदोलनही केले होते. सभेला आयुक्त खेबुडकर गैरहजर असल्याने त्यांचा संताप अधिक वाढला. मागासवर्गीय व त्यातही महिला असल्याने आयुक्तांकडून जाणीवपूर्वक माझी कामे अडविली जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. महापौर व उपायुक्त सुनील पवार यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत सोबत आणलेला एक मोठा दगड त्यांनी डोक्यावर मारून घेण्याचा प्रयत्न केला. काही महिला सदस्यांनी तत्परतेने त्यांचा हात धरल्यामुळे प्रसंग टळला. तरीही त्यांच्या हातातील दगड काढून घेताना दहा मिनिटे झटापट सुरूच होती. अखेर तो दगड काढून घेऊन सभागृहाबाहेर नेण्यात आला. त्यानंतरही कांबळे यांनी फायलींवर सह्या होईपर्यंत आसनावर न बसण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याप्रमाणे अन्य नगरसेवकही आयुक्तांच्या कारभारावर नाराज होते. सत्ताधारी कॉंग्रेस, विरोधी राष्ट्रवादी, स्वाभिमानी विकास आघाडी, शिवसेना अशा सर्वच पक्षाच्या सदस्यांनी प्रलंबित फायलींवरून सभागृह डोक्यावर घेतले. राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी यांनी सदस्यांच्या फायलींवर आयुक्त जाणूनबुजून सह्या करीत नसल्याचा आरोप केला.
नगरसेवक शेखर माने यांनी सत्ताधार्यांवर जोरदार टीका केली. एका महिला सदस्याला न्याय देता येत नसेल तर हे सत्ताधारी गटाचे व महापौरांचे दुर्दैव आहे. अपेक्षित वसुलीचे प्रशासनाचे कारण चुकीचे आहे. हा खेळ आता थांबवून सदस्यांना न्याय द्यावा.युवराज गायकवाड म्हणाले की फायली रोखणार्या आयुक्तांचा पगारच थांबविण्यात यावा. त्यांच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढावी.विष्णू माने म्हणाले की, आयुक्त ठराविक नगरसेवकांचीच कामे करीत आहेत. इतरांच्या फायली ते जाणीवपूर्वक अडवित आहेत. त्यामुळे त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणावा.