मराठी पुस्तकात गुजराती धडे, बाईंडिंग वाल्यावर होणार कारवाई”
(म.विजय)
मुंबई दि.१७ – इयत्ता सहावीच्या भुगोलाच्या पुस्तकात सहा पाने गुजरातीत छापल्याने विधानसभेत मोठा गदारोळ निर्माण झाला होता. या प्रकरणी विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षांना धारेवर धरत यासाठी माफी मागावी, अशी मागणी केली होती. तसेच भाजप सरकार किती लाचारी करणार असा प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे कामकाज बंद पाडले होते. यावर आज शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी निवेदन प्रसिद्ध करून यावर स्पष्टीकरण दिले आहे.
सहावीच्या भुगोलाच्या साडे अकरा लाख प्रतींची छपाई सरकार करणार होती, त्यापैकी १ लाख प्रतींची छपाई व बांधणीचे काम अहमदाबादच्या मेसर्स श्लोक प्रिंट सिटी या संस्थेकडे सोपवण्यात आले होते. तसेच या संस्थेच्या भगिनी संस्थेकडे गुजराती माध्यमांच्या कमी प्रतीच्या पुस्तकांच्या छपाईचे कंत्राट दिले होते. पण या संस्थेने चुकून ६ पाने गुजरातीमध्ये छापल्याची शक्यता शिक्षण मंत्र्यांनी निवेदनाद्वारे वर्तवली. या प्रकरणी श्लोक प्रिंट सिटीवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले आहे. तसेच नुकसानभरपाईची तरतूद निविदेच्या अटी व शर्तींमध्ये असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे. राज्यातील सर्व पाठ्यपुस्तक विक्रेत्यांना पुस्तकं बदलून देण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या आहेत. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नसल्याचे प्रतिपादन विनोद तावडे यांनी केले आहे.
या प्रकरणी जेव्हा गदारोळ झाला तेव्हा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी हा विरोधकांचाच कट असल्याचा आरोप केला होता. या आरोपाला प्रत्युत्तर देताना तटकरे यांनी हा आरोप खरा ठरल्यास आपण आत्महत्या करू, असे म्हटले होते.