मराठा आरक्षण : UPDATE
मुंबई दि.०९ – पहिल्यांदाच मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमधून ठाणे आणि नवी मुंबईतील मराठा क्रांती मोर्चेकऱ्यांनी माघार घेतली आहे. मात्र, यापूर्वी बंद आंदोलनादरम्यान दोन्ही ठिकाणी झालेला हिंसाचार पाहता, आज ही दोन्ही शहरं शांत राहणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पंढपूरमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेटसेवा खंडित करण्यात आली आहे. तर या आंदोलनाचे केंद्र ठरु शकणाऱ्या मुंबईतही एसटी सेवा जवळपास ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. यापूर्वीच्या आंदोलनादरम्यान एसटी बसेसला लक्ष्य करण्यात आले होते.
त्यामुळे एसटी प्रशासनाने नेहरुनगर, परळ आणि मुंबई सेंट्रल हे तिन्ही डेपो बंद ठेवले आहेत. दरम्यान, आजच्या बंद आंदोलनाला सुरुवात झाली असून राज्याच्या विविध भागांमध्ये त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, लोणावळा, धुळे, यवतमाळ, अकोला, पुणे, बीड आणि जालना शहरातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. यापूर्वी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने बंद आंदोलन करण्यात आले होते. मात्र, यावेळी पहिल्यांदाच मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.