मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अटलजींना अनोखी श्रद्धांजली वाहिली
मुंबई दि.१८ – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून अटलजींना अनोखी श्रद्धांजली वाहिली. राज ठाकरे यांनी नवीन व्यंगचित्र रेखाटले. या व्यंगचित्रात एका कवितेचा शेवट लिहिलाय आणि त्याखाली अटलजींची स्वाक्षरी आहे. “मेरे प्यारे भारतवासियों…आपका नम्र…अटल बिहारी वाजपेयी…” असा मजकूर लिहिलाय. या व्यंगचित्रावर राज ठाकरे यांनी एक महाकाव्य संपले..! अशी भावना व्यक्त केली.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर राजघाटाजवळील स्मृतीस्थळावर अंत्यसंस्कार करण्यात आहे. साश्रूनयनांनी अटलजींना अखेरचा निरोप देण्यात आला. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं गुरूवारी सायंकाळी दिल्लीतल्या ‘एम्स’ हॉस्पिटलमध्ये वयाच्या 94 व्या वर्षी प्राणज्योत मालवली. 94 वर्षांचे वाजपेयी हे गेल्या काही वर्षांपासून डिमेंशियाने आजारी होते. प्रकृती अस्वस्थतेमुळं वाजपेयी यांनी सार्वजनिक जिवनातून निवृत्तीही घेतली होती. भाजपचे संस्थापक सदस्य असलेल्या वाजपेयींनी तीन वेळा देशाचं पंतप्रधानपद भूषवलं होतं. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते बिगर काँग्रेस पक्षाचे पहिलेच नेते होते. आज दिल्लीतील राजघाटाजवळील स्मृतीस्थळावर देशातील आणि विदेशातील मान्यवरांनी अटलजींना अखेरचा निरोप दिला. यावेळी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता.