मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे ‘ते’ जुने व्यंगचित्र आज पाहाच
आपल्या कुंचल्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला लक्ष्य करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ एप्रिल २०१८ रोजी ‘बाबांनो, हेच ते अच्छे दिन!’ असे म्हणत एक व्यंगचित्र रेखाटले होते. या व्यंगचित्रातून त्यांनी मोदी-शहा या जोडीला कुंचल्यातून चांगलेच फटकारले होते. गेल्या काही दिवसांपासून सतत इंधनदरात वाढ होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती नव्वदच्या घरात पोहोचल्या आहेत. सर्वसामान्यांना महागाईची झळ बसत आहे म्हणून इंधनदरवाढीविरोधात काँग्रेसने भारत बंद पुकारला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पेट्रोलच्या वाढत्या किंमतीवर पाच महिन्यांपूर्वी रेखाटलेले व्यंगचित्र आज मनसेने पुन्हा एकदा रिट्विट केले आहे. मनसेने भारत बंदला पाठिंबा दिला असून या बंदमध्ये मनसे पूर्ण ताकदीनिशी उतरली आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी करण्याच्या मागणीसाठी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
बंद कशासाठी? हे व्यंगचित्र आवर्जुन पहा… तुम्हाला उत्तर नक्की मिळेल!
(नोंद :- खालील व्यंगचित्रं हे ४ एप्रिल २०१८ रोजी राजसाहेबांनी काढलेलं व्यंगचित्रं आहे.) pic.twitter.com/3Vwjqt02cF— MNS Adhikrut (@mnsadhikrut) September 10, 2018
काँग्रेसच्या भारत बंदला पाठिंबा देणाऱ्या मनसेने मुंबई, पुणे, नाशिकसह विविध ठिकाणी जोरदार आंदोलन सुरू केले आहे. मनसे कार्यकर्त्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याची मागणी केली आहे. रस्त्यांवर उतरून केंद्र सरकारविरोधात रान उठवणाऱ्या मनसेने सोशल मीडियावरूनही केद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. राज ठाकरे यांनी रेखाटलेले व्यंगचित्र आवर्जून पाहाच…तुम्हाला उत्तर नक्की मिळेल, असे म्हणत मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून राज यांचे जुने व्यंगचित्र रिट्विट केले आहे.