मध्य रेल्वेच्या आरपीएफ इन्स्पेक्टर रेखा मिश्रा दहावीच्या पुस्तकात
मुंबई- मध्य रेल्वेच्या आरपीएफच्या इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांची कामगिरी आता दहावीच्या कुमारभारती पुस्तकात ‘वीरांगणा’ या धडय़ात मराठी पहिली भाषा निवडणा-या मुलांना वाचायला मिळणार आहे. रेखा मिश्रा यांनी देशभरातून आपले घरदार सोडून मुंबईत आलेल्या चारशेहून अधिक लहान मुलांची त्यांच्या पालकांशी भेट घडवून आणली आहे. अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी विषयात एमए आणि बीएड करणाऱया रेखा मिश्रा या २००८ मध्ये रेल्वे पोलीस दलाची परीक्षा देऊन मध्य रेल्वेच्या आरपीएफमध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाल्या.
त्यांनी आरपीएफच्या महिला सुरक्षा वाहिनीत काम केले. त्यानंतर अवघ्या दीड वर्षात त्यांनी रेल्वे स्थानकांत भटकणाऱया ४३४ मुला-मुलींची सुखरूपपणे त्यांच्या पालकांशी भेट घडवून आणली.दहावीच्या एसएससी बोर्डाच्या कुमारभारती पुस्तकात ‘वीरांगणा’ या आशयाच्या धडय़ात लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक आणि आरपीएफ इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या जीवनपटाचा समावेश केल्याचे एसएससी बोर्डाच्या सदस्या डॉ. शारदा निवाते यांनी सांगितले.