भुजबळ लढवय्ये, ते जेलबाहेर आले पाहिजेत: मंत्री दिलीप कांबळे

(म विजय)

“छगन भुजबळ हे लढवय्ये नेते आहेत. ते जेलबाहेर आले पाहिजेत”, असं धक्कादायक वक्तव्य दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर राज्याचे समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केलं. ते पुण्यात बोलत होते.
महात्मा फुलेंच्या पुण्यतिथी निमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून पुण्यात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी दिलीप कांबळे बोलत होते.
दिलीप कांबळे म्हणाले, “ज्या कलमाच्या आधारे छगन भुजबळ यांना जामीन मिळत नव्हता ते कलम रद्द झाल्याने आता छगन भुजबळ लवकरच बाहेर येतील. छगन भुजबळ हे लढवय्ये नेते आहेत. ते कायद्याच्या कचाट्यात अडकले, मात्र लवकरच ते जेलबाहेर येतील”.
भुजबळांना लवकर जामीन मिळावा ही ईश्वर चरणी प्रार्थना. कायदेशीर लढाई लढून ते लवकरच बाहेर येतील, असा विश्वास दिलीप कांबळे यांनी व्यक्त केला.
एकीकडे भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी प्रचंड पाठपुरावा करुन, भुजबळांबाबतची प्रकरण बाहेर काढली, त्याबाबत विविध तक्रारी करुन, भुजबळांना अटक झाली. मात्र त्यांचाच मंत्री आता भुजबळ बाहेर यायला हवेत असं म्हणत असल्याने, सोमय्यांनाच ही चपराक म्हणावी लागेल.
दरम्यान, समता परिषदेकडून दिला जाणारा ‘समता पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ विचारवंत मा.गो.माळी यांना देण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण झालं.
यावेळी केंद्र सरकार मधील मंत्री उपेंद्रसिंह कुशवाह आणि राज्य सरकार मधील मंत्री दिलीप कांबळे हे दोन भाजप नेतेही उपस्थित होते.
दिलीप कांबळे हे इथले स्थानिक आमदार असून त्यांच्या विधानसभा मतदार संघामध्ये फुले वाडा आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email