भिवंडी काल्हेर येथे सजावटीचे साहित्य साठविलेल्या गोदामास भीषण आग चार गोदामे जळून खाक
भिवंडी : दि . ११ भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायत हद्दीतील पृथ्वी कॉम्प्लेक्स या गोदाम संकुलातील मंडप सजावटीचे साहित्य व त्या सोबत महिला शृंगाराचे प्लास्टिक साहित्य साठविलेल्या गोदामास दुपारी अचानक आग लागून या आगीत चार गोदामे जाळून खाक झाली आहेत . हि आग विझविण्यासाठी भिवंडी पाठोपाठ कल्याण , उल्हासनगर , अंबरनाथ , ठाणे येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले . या आगीवर तब्बल दोन तासाच्या प्रयत्नानं नंतर नियंत्रण मिळविण्यात आले असून या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जाळून खाक झाले आहे .
भिवंडी ठाणे रस्त्यावरील काल्हेर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पृथ्वी कॉम्प्लेक्स या गोदाम संकुलात A / 5 इमारती मधील गाळा क्रमांक 1 व 2 या ठिकाणी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली , या गोदामात मोठ्या प्रमाणावर मंडप सजावटीचे साहित्य , कापडी झालर , प्लास्टिक सजावटीचे साहित्य त्याच बरोबर महिलांच्या शृंगाराचे प्लास्टिक साहित्य साठविले असल्याने आग लागताच ती सर्वत्र पसरत या गोदामाच्या आतील बाजूनेच असलेल्या जिन्यातून पहिल्या मजल्यावरील गोदामात सुध्दा आग पसरत चार हि गोदामे जळून खाक झाली आहेत . आगीची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले . परंतु आग सर्वत्र पसरू नये व आग विझविण्यासाठी समोरील बाजूने शक्य नसल्याने कल्याण , ठाणे , उल्हासनगर , अंबरनाथ अग्निशामक दलाची मदत हि आग विझविण्यासाठी घेण्यात आली . समोरील शटर च्या बाजूने मोठ्या प्रमाणावर फक्त धूर येत असल्याने अग्निशामक दलाच्या जवानांनी या गोदामांच्या भिंती तोडून तेथून आग वीजवित या आगीवर नियंत्रण मिळविले असल्याची माहिती कल्याण डोंबिवली अग्निशामक दलाचे अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली आहे .