भिवंडीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग; जीवितहानी नाही..
भिवंडी:- येथील टावरे कंपाऊंड येथील एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. गोदामात प्लास्टिक आणि कागदाच्या वस्तू साठवल्या असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. आज सायंकाळच्या सुमारास लागलेल्या या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, भंगार दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
टावरे कंपाऊड परिसरातील अशोक नगरमध्ये हे भंगाराचे दुकान आहे. आज सायंकाळच्या सुमारास अचानक या दुकानाला आग लागली. त्यानंतर या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर ४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणायला अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळाले.
या आगीच्या घटनेमुळे परिसरात धुरांचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. तसेच या गोदामालगतच्या रहिवाशीयांनी या आगीची तिव्रता पाहून तात्काळ घरे खाली करून खबरदारी घेतली होती. या आगीचे कारण अस्पष्ट आहे.
भिवंडी शहरात अनेक भंगारची गोदामे अनधिकृतपणे उभी राहिली आहेत ही गोदामे रहिवाशी परिसरात असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच ही गोदामे अतिशय दाटीवाटीच्या परिसरात असल्याने अशा प्रकारच्या आपत्ती काळात अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहचण्यासाठी उशीर होत असल्याचे आजच्या घटनेने पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यामुळे अशा अनधिकृत गोदांमावर पालिकेच्या वतीने कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.