भारत स्टार्ट- अप समुदायाचे जागतिक केंद्र बनेल
देशाच्या विकास यात्रेत परिवर्तनात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता देशातल्या स्टार्ट-अप्समध्ये आहे असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग आणि नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू म्हणाले. ते आज नवी दिल्लीत भारतीय स्टार्ट अप्स परिसंस्था-2018 चा स्थिती अहवाल प्रकाशित केल्यावर बोलत होते. देशातल्या स्टार्टअप्सना विकसित होण्यासाठी सकारात्मक आणि सक्षम परिसंस्था उपलब्ध करुन देण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय अनेक उपाययोजना करत असल्याचे ते म्हणाले. पारंपारिक उद्योगांसाठी जे नियम आणि कायदे होते, त्यांचा आढावा घेतला जात असून त्यातील काही रद्द करण्यात येत आहेत तर काहींमध्ये सुधारणा करण्यात येत आहे, जेणेकरुन स्टार्टअप्सना प्रोत्साहन मिळेल असे ते म्हणाले.
भारतीय स्टार्टटअप्समध्ये अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी पुढल्या महिन्यात भारतात जागतिक गुंतवणुकदारांची परिषद आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
व्यवसाय सुलभतेच्या क्रमवारीत अव्वल 50 देशांमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले.