भारतीय वंशाच्या दीपा आंबेकर न्यूयॉर्क शहरातील न्यायालयाच्या न्यायाधीशपदी
भारतीय वंशाच्या दीपा आंबेकर यांनी मराठी माणसांची मान अभिमानानं उंचावली आहे. न्यूयॉर्क शहरातील दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीशपदी दीपा आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायाधीशपदी निुयक्ती होणा-या त्या पहिल्या महाराष्ट्रीय आणि दुस-या भारतीय वंशाच्या महिला न्यायाधीश ठरल्या आहेत.
दीपा आंबेकर या अमेरिकेत स्थानिक झालेल्या प्रज्ञा आणि सुधीर आंबेकर यांच्या कनिष्ठ कन्या आहेत. आणि पुण्यातील मान्यवर डॉ. उप्रेंद वडगावकर यांच्या त्या नात आहेत. आंबेकर या ४१ वर्षांच्या असून त्या फौजदारी न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहणार आहेत. लॉ फार्ममधील लठ्ठ पगाराची नोकरी सोडून त्याहून ७० टक्के कमी वेतन स्वीकारुन त्यांनी लीगल एड्स सोसायटीसाठी काम सुरु केले.तसंच नागरी सुरक्षा समितीवर सल्लागार म्हणूनही काम केलं आहे. त्यांनी पदवीचं शिक्षण मिशिगन विद्यापीठातून पूर्ण केलं असून रुटर्स लॉ स्कूलमधून कायद्याची पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी न्यूयॉर्क सिटी कौन्सिल येथे सिनियर लेजिस्लेटिव्ह कौन्सल वरिष्ठ विधान वकील हे पद मिळवून आपला न्यायव्यवस्थेचा अनुभव अधिक विस्तृत केला.