भारतातून हत्तीरोगाचे उच्चाटन करण्यासाठीचा गतीमान आराखडा जारी
नवी दिल्ली – हत्तीरोग आणि त्याचा प्रसार यांच्या उच्चाटनासाठी भारत कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनी केले. हत्तीरोग उच्चाटनासाठीच्या दहाव्या जागतिक आघाडीच्या बैठकीत ते आज नवी दिल्ली येथे बोलत होते. भावी पिढी हत्तीरोगापासून मुक्त रहावी असे सांगतानाच या रोगाच्या उच्चाटनासाठीच्या नवनव्या संशोधनाचे आणि उपक्रमांचे भारताने नेहमीच स्वागत केले आहे असे त्यांनी सांगितले.
हत्तीरोगाच्या उच्चाटनामध्ये भारताने लक्षणीय प्रगती केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारे आणि विकास भागीदारांच्या एकत्रित प्रयत्नातून हत्तीरोगाचे सर्वाधिक प्राबल्य असणाऱ्या 256 जिल्ह्यांपैकी 100 जिल्ह्यांनी रोगमुक्तीचे उद्दीष्ट साध्य केले आहे. प्रसार मूल्यांकन सर्वेक्षणानंतर व्यापक प्रमाणात देण्यात येणारा औषध कार्यक्रम थांबवण्यात आला असून सध्या हे जिल्हे निगराणीखाली असल्याचे नड्डा यांनी सांगितले.