भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती  पुतळ्याचे अनावरण

(श्रीराम कांदु) 

डोंबिवली – भारतरत्न डॉ.बाबासाहेब  आंबेडकर यांचे कार्य इतके महान व भावी पिढ्यांना प्रेरणादायी आहे कि त्यांची अनेक स्मारके उभारली तरी कमीच आहेत असे गौरवोद्गार ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. डोंबिवलीतील कल्याण -डोंबिवली महानगरपालिकेच्या आवारात उभारण्यात आलेल्या दहाफूट उंचीच्या डॉ.बाबासाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शिंदे यांच्या हस्ते शनिवारी रात्री जयंतीच्या पूर्वसंध्येला झाले त्यावेळी ते जमलेल्या भव्य डोंबिवलीकर जनसमुदायासमोर बोलत होते. याप्रसंगी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, महापौर राजेंद्र देवळेकर ,नागपूरहून आलेले बौध्द भिक्षुक बन्ते ,आमदार सुभाष भोईर, स्थायी सभापती सभापती राहुल दामले, सदानंद थरवळ, माजी महापौर रमेश जाधव, विरोधी पक्ष नेते मंदार हळबे, रिपाई शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड ,बसपा महाराष्ट् सचीव दयानंद किरतकर , शिक्षण समिती सभापती विश्वदीप पवार, शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे  समाजातील विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते. या पुतळ्याच्या उभारणीस आवश्यक परवानगी मिळाली कि नाही याबाबत शहरात चर्चा होती परंतू कायद्याच्या निर्मात्याच्या पुतळ्यास कायदा कसा आड येईल ?  असे सांगून एकनाथ शिंदे यांनी याविषयावर पडदा पाडला. राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी महाडच्या चवदार तळ्याचे पाणी विशेष प्रक्रिया करुन शुध्द करुन लवकरच चवदार करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याची माहिति आपल्या भाषणात दिली.पंचवीस वर्षांच्या संघर्षानंतर अखेर आंबेडकरी जनतेचे स्वप्न साकार होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले हाच अनुयायांसाठी सुदिन .मुंबईचे  शिल्पकार स्वप्नील कदम यांनी पुतळा तयार केला आहे.पुतळ्याची उंची दहा फुट असून पुतळ्याखालील चौथरा बारा फुट ऊंच आणि पाच फुट रुंद आहे संपूर्ण ग्रेनाईटचे आच्छादन करण्यात आले आहे.  पुतळ्याच्या मागील बाजूस अल्युमिनियम प्रणाली माध्यमातून वेगळे सुशोभिकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्या मागील भिंतीवर पिंपळ वृक्षाच्या हिरव्या आणि पिवळ्या पानांचे रेखाटन करण्यात आले आहे. तसेच चार दिव्यांची विद्युत रोषणाईने पुतळा झगमगत होता.    रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे डोंबिवली शहरअध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा महापलिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या शेजारी लवकरात लवकर बसवावा या मागणीसाठी उपोषण केले होते. त्यावेळी गायकवाड यांना आश्वासन देण्यात आले होते. त्याची पूर्तता होत असल्याने सर्व डॉ. आंबेडकर अनुयानी  जयंती दिनी आनंदोत्सव साजरा करतील असे सांगून गायकवाड यांनी पालकमंत्री व राज्यमंत्री यांचा सत्कार केला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email