भय्यू महाराज यांची आत्महत्या, गोळी झाडून आयुष्य संपवलं
आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडल्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते.
भय्यू महाराज यांची आत्महत्या
इंदूर: आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडल्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मध्य प्रदेशातील इंदूर येथील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
भय्यू महाराज यांनी आत्महत्या का केली, याबाबतची माहिती अजून कळू शकलेली नाही.
भय्यूजी महाराज यांना ‘राष्ट्रसंत’ म्हणून संबोधलं जातं. अध्यात्मिक क्षेत्रात ते प्रसिद्ध आहेत. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ते सक्रीय असतात. राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांसोबत त्यांची उठबस असते.
काही दिवसांपूर्वी शिवराज सिंह सरकारने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. भय्यू महाराज यांच्या आश्रमात अनेक व्हीआयपी व्यक्ती येत असत. कलाकार, गायक, उद्योगपती, राजकारण इत्यादी अनेक दिग्गज व्यक्ती भय्यू महाराजांच्या आश्रमात येत.
भय्यू महाराज यांनी काही महिन्यांपूर्वी दुसरं लग्न केलं होतं.
भय्यू महाराज यांनी 2011 साली लोकपाल आंदोलनातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. अण्णा हजारेंचं आंदोलन मागे घेण्यासाठी केंद्र सरकारने भय्यू महाराजांनी दूत म्हणून पाठवले होते. तसेच, गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा सद्भावना उपवास सोडण्यासाठी भय्यू महाराज यांना बोलावले गेले होते.
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख, शरद पवार, लता मंगेशकर, उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, मिलिंद गुणाजी इत्यादी अनेक दिग्गज भय्यू महाराजांच्या आश्रमात जाऊन आले आहेत.
भय्यू महाराज यांचं कार्य
भय्यू महाराज हे सदगुरु धार्मिक ट्रस्ट नावाने ट्रस्ट चालवत असत. या ट्रस्टच्या माध्यमातून स्कॉलरशिप देत. तसेच, कैद्यांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत करत. शेतकऱ्यांना बियांणांचे वाटप असो किंवा शेतकऱ्यांना विविध मदत करण्यासाठीही त्यांनी मदत केली.
नगरच्या निर्भयाचं स्मारक
अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या सर्वोदय परिवाराच्या वतीनं अहमदनगरमधील कोपर्डी इथं बलात्कार पीडित चिमुकलीचं स्मारक बांधण्यात आलं होतं.
भय्यू महाराजांवर हल्ला
महाराष्ट्रात मराठा मोर्चे निघत होते त्या काळात भय्यूजी महाराज यांच्यावर हल्लेही झाले होते.
भय्यू महाराज यांच्यावर दोन वेळा प्राणघातक हल्ला झाल्याची तक्रार त्यांच्या चालकानं 10 मे 2016 रोजी दाखल केली होती. या हल्ल्यामध्ये भय्यूजी महाराज सुखरुप होते, तर कारचालक आणि सहकाऱ्यांना इजा झाली होती