बेंजोवाद्य घरी नेल्याने झालेल्या वादातून तरुणावर सशस्त्र हल्ला,डोंबिवलीतील घटना
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – पूर्वेकडील आजदे गावात शनिवारी रात्रीच्या सुमारास बेंजो वाद्य घरी नेल्याच्या वादातून झालेल्या भांडणात एक तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली. यावेळी झालेल्या भांडणात राष्ट्रवादीच्या कार्यध्यक्षाही जखमी झाल्या आहेत.
डोंबिवली पुर्वेकडील आजदे गाव परिसरात मयूर केणे याने सूरज पाटील यांच्या ऑर्डरचे पैसे न दिल्याने सूरजने मयुरचे बेंजोचे सामान आपल्या घरी आणून ठेवले होते. शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मयुर आपले सामान मागण्यासाठी सूरजच्या घरी गेला. यावेळी सुरजच्या घरी त्याचा मित्र आदित्यही होता. त्यावेळी सुरजच्या वडिलांनी मयुरला समजावून घरी पाठवून दिले. त्यानंतर आदित्य देखील घरी जाण्यास निघाला. काही वेळाने आदित्यने सूरज पाटीलच्या वडीलांना फोन करत मयुर मला शिवीगाळ करत असल्याचे सांगितले. तेव्हा शशिकांत पाटील हे पत्नी सविता, मुलगा सूरज आणि वहिनी व राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यध्यक्षा विनया पाटील हे सर्वजण त्या ठिकाणी मयुरला समजावण्यासाठी गेले. मात्र मयूरचे मामा संदीप गायकर याने आदित्यला ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली तर मयुरची आजी भीमाबाई गायकर यांनी विनया पाटील यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. यावेळी विनया जखमी झाल्या आहेत. याच दरम्यान मयुरने धारदार शस्त्राने सूरजवर हल्ला केला. या हल्ल्यात सूरज गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.