बिबट्याच्या शिकाऱ्यासह वाघाच्या कातडीच्या तस्कराला अटक

गुन्हे अन्वेषण विभागाच्या कल्याण पथकाची कारवाई

(श्रीराम कांदु)

डोंबिवली – बिबट्या आणि वाघाच्या कातडीची विक्री करण्यास डोंबिवलीत आलेल्या दोघा तस्करांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या कल्याण पथकाने काही दिवसांपूर्वी मुद्देमालासह अटक केली होती. या पथकाने याच बिबट्याच्या शिकाऱ्यासह वाघाच्या कातडीच्या तस्कारालाही अटक करण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक आरोपींची खंख्या आता चारवर पोहचली आहे.

   तुकाराम हरी वीर (५८) असे अटक केल्या शिकाऱ्याचे नाव असून तो रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील आंबेवाडी गावचा रहिवाशी आहे. तर अनिल दत्तू घोलप (४३ ) हा मिरारोडला शांतीनगर परिसरात राहणारा असून तो वाघाच्या कातडीचा तस्कर असल्याचे समोर आले आहे. या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी कल्याण कोर्टाने सुनावली आहे. विशाल धनराज (३०) व सचिन म्हात्रे (३३) या दोघांना १९  एप्रिल रोजी बदलापूर पाईप लाईन रोडला कोळे  गावाजवळ सापळा लावून अटक करण्यात आली होती.  या दोघांकडून बिबट्या व वाघ सदृष्य कातडे गुन्हे अन्वेषण विभागाने हस्तगत केले होते. चौकशी दरम्यान या तस्करांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तुकाराम वीर याला तो राहत असलेल्या गावातून अटक केली. त्याचाकडून ठासणीची बंदूक आणि बिबट्याची १८  नखे हस्तगत करण्यात आली. तुकाराम वीर हा राहत असलेल्या खोंडा जंगलमध्ये बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. यातील एका बिबट्याने दोन महिन्यांपूर्वी तुकारामच्या ३०  शेळ्या, एक गाय, एक बैल मारले होते. आपल्या जनावरांचे नुकसान झाल्यामुळे चिडलेल्या तुकारामने याच बिबट्याला ठासणीच्या बंदुकीतून गोळी झाडून ठार मारले. त्याचे वडीलदेखील खूप मोठा शिकारी होते. मात्र तुकारामकडे असलेली बंदूक बेकायदेशीर असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी अटक केलेला अनिल घोलप याने वाघाच्या कातड्याची तस्करी केल्याची कबुली दिली आहे. मात्र हा तस्कर उडवाउडविची उत्तरे देत आहे. येत्या दोन दिवसात ही कातडी त्याने कुणाकडून घेतली हे देखील स्पष्ट होणार असल्याने वपोनी संजू जॉन यांनी सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email