बहिणीशी चॅटींग केल्याच्या रागातून तरूणावर जीवघेणा हल्ला

डोंबिवली  – बहिणीशी चॅटींग केल्याचा राग मनात धरून भावाने एका तरूणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना डोंबिवलीजवळच्या आजदे गावात गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. एकीकडे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणावर निवासी विभागातील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे हल्लेखोर भाऊ अद्याप फरार असून पोलिस त्याचा कसोशीने शोध घेत आहेत.
 मंदार तेली असे जखमी तरुणाचे नाव असून  हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात  उपचार सुरु आहेत. १४  फेब्रुवारी रोजी सर्वत्र व्हॅलेंटाईन डे सर्वत्र साजरा करण्यात येत होता. याच दिवशी आजदे गावात राहणारा मंदार तेली या तरूणाने एका तरुणीशी व्हाट्सएपवर चॅटींग करून तिला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या. मात्र आपल्या बहिणीशी गेल्या दीड महिन्यापासून मंदार हा चॅटींग करीत असल्याच कळताच या तरुणीचा भाऊ प्रवीण याने त्याचा मित्र पवन घाडीगावकर याच्या मदतीने गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मंदार याचे आजदे गावात जाऊन मंदार याच्या ओटीपोट व पाठीवर धारदार चाकूने सपासप वार केले. त्यानंतर त्याला जखमी अवस्थेत आपल्या दुचाकीवर बसवून नेपच्यून हॉस्पिटलच्या गेटवर नेऊन टाकले. या हल्ल्यात मंदार जबर जखमी होऊन कोसळला. लोकांनी उचलून त्याला निवासी विभागातील एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्रचंड प्रमाणात रक्तस्त्राव झालेल्या मंदारची प्रकृती खालावल्याने त्याला अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले आहेत. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोर प्रवीण व त्याचा साथीदार पवन घाडीगावकर हे दोघेही फरार झाले आहेत. पोलिसांचे पथक त्यांचा शोध घेत असल्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त रविंद्र वाडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email