फ्लॅगशिप योजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर
ठाणे दि १७ – ठाणे जिल्ह्यातील नागरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढले असले तरी ग्रामीण आणि आदिवासी भागही आहे, त्यांच देखील परिपूर्ण विकास झाला पाहिजे हे विशेष करून पहिले जाईल तसेच राज्य व केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर दिला जाईल असे ठाण्याचे नूतन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी काल पत्रकारांना सांगितले. ते काल जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांची उपस्थिती होती.
येणाऱ्या काळातील निवडणुका पहाता आचारसंहिता कालावधीपूर्वीच जिल्हा नियोजनच्या निधीचा पूर्णपणे विनियोग कसा होईल यावरही आपण लक्ष्य देणार आहोत तसेच पर्यावरण संरक्षण, अनधिकृत बांधकामे, रासायनिक कारखान्यांमुळे उद्भवणारी परिस्थिती याबाबतही आपण नागरिकांशी संवाद साधून उपाययोजना करुंत असेही ते म्हणाले. ग्रामीण पर्यटनाच्या देखील खूप संधी याठिकाणी आहेत, त्यांचाही कसा विकास करता येईल हे पाहिले जाईल असे ते म्हणाले.
ठाण्यामध्येच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झाले असल्याने ठाण्याविषयी माहिती आणि आत्मीयता आहे परंतु आता ठाणे जिल्हा झपाट्याने बदलला आहे. काही नागरीकरणाच्या समस्या पुढे आल्या आहेत, त्या दृष्टीने निश्चितच पाऊले उचलण्याचा प्रयत्न केला जाईल असेही ते म्हणाले. स्मार्ट सिटीज च्या बाबतीतही वेळेत प्रकल्प पूर्ण होतील हे पाहण्यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय ठेवला जाईल असेही ते म्हणाले.